भारतीयांनी चिनी माल घेणं बंद केलं तर चीन जागेवर येईल असं मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांना चीनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीयांनी चिनी मालावर बहिष्कार टाकला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचे पहायला मिळालं.

भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने चिनी कंपन्यांसोबत केलेल्या राज्यातील पाच हजार कोटींच्या प्रकल्पावर स्थगिती आणल्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ्प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत “ते करायलाच पाहिजे ना” असं उत्तर दिलं. ““जे राष्ट्र आपल्या राष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघतं, आपल्याविरोधात कुरबुरी काढतं अशा राष्ट्रांच्या विरोधात कडक भूमिका घेतलीच पाहिजे.  त्या देशात (चीनमध्ये) तयार होणारी एकही गोष्टी भारतीयांना वापरु नये. सव्वाशे कोटी जनतेनं हे असं केलं तर चीन जागेवर येईल,” असं रोकठोक मत अजित पवार यांनी मांडलं.

आणखी वाचा- “रामदेव बाबांच्या करोना औषधावर ज्यांचा विश्वास त्यांनीच ते घ्यावं ”

१५ जून रोजी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधील सैन्यात झालेल्या हिंसेमध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर चिनी मालाविरोधात देशात जागोजागी आंदोलन करण्यात आल्याचं चित्र पहायला मिळालं. चिनी मालावर बंदी घालण्याची मागणी अनेक स्तरांमधून होताना दिसत आहे. त्यातच केंद्र सरकारनेही चीनची आर्थिक नाकाबंदी करण्यासंदर्भातील काही पावलं उचलल्याचंही मागील आठवड्यात पहायला मिळालं.

आणखी वाचा- चांगली बातमी : लवकरच सुरू होणार सलून, ब्युटी पार्लर्स; मंत्र्यांनी दिली माहिती

करोनाबद्दलची भीती कमी झाली

करोनाबद्दलची नागरिकांमधील भीती कमी झाली आहे असं मत यावेळेस बोलताना अजित पवार यांनी व्यक्त केलं. “राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णांचा आकडा वाढतोय हे आपण लक्षात घ्यायला हवं. राज्याबरोबरच देशात इतर ठिकाणी काय काय होतयं याचाही आम्ही आढावा घेतोय,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. “सोशल डिस्टन्सींग आणि बाहेर जाताना अंतर ठेवणं आणि मास्क घालणं आवश्यक आहे. आपण आपली काळजी घेणं हे महत्वाचं आहे. थोडी जरी लक्षण दिसली तरी जवळच्या दवाखाण्यामध्ये संपर्क करा. आज जवळजवळ तीन महिने झाले डॉक्टर, नर्सेस, पोलीस काम करत आहेत. मात्र या कालावधीमध्ये डॉक्टरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे नागरिकांमधील भिती कमी झाली आहे,” असंही अजित पवार म्हणाले. याचबरोबर करोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासंदर्भात राज्य सरकार काम करत असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.