मुंबई: राज्यातील प्राणवायूची वाढती मागणी लक्षात घेता राज्यात उत्पादित होणाऱ्या सुमारे १२७० मेट्रिक टन साठय़ासह परराज्यातून मिळणारा साठा असे एकंदरीत सुमारे १७०० मेट्रिक टन प्राणवायूचे वितरण दरदिवशी करण्यात येत आहे.

राज्यात आयनॉक्स इंडिया, लींडे, एअर लिक्विड, टायो निप्पॉन, जे.एस.डब्ल्यू हे पाच प्राणवायूचे प्रमुख उत्पादक असून दरदिवशी एकूण १२७० टन प्राणवायूची निर्मिती करण्यात येते. राज्यात उत्पादित होणारा आणि परराज्यातून मिळणारा असा राज्यासाठी १७८४ टन प्राणवायूचा साठा केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याला नेमून दिला आहे. त्यानुसार आता दरदिवशी राज्यातील १२७० टन आणि परराज्यातून मिळणारा साठा असा एकूण सुमारे १७०० टन प्राणवायूचा पुरवठा जिल्ह्य़ांना केला जातो. सर्व जिल्ह्य़ांना सुरळीत पुरवठा करण्यासाठी विवरणपत्र तयार केले जाते, असे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले.

राज्यात १ मे रोजी विक्रमी १७१० टन प्राणवायूचे वितरण करण्यात आले. यात गुजरातमधून ८२.७९ टन, भिलाई छत्तीसगड येथून ९४ टन, बेल्लारी, कर्नाटक येथून ३६.९५ टन तर हैदराबाद, तेलंगणामधून २८.५९ टन असे एकूण २४२.३३ टन प्राणवायू परराज्यातून मिळाला होता.

आठ लाख रेमडेसिविरच्या कुप्या

केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याला दिलेला रेमडेसिवीरच्या साठय़ात वाढ केल्याने आता राज्याला ८ लाख ९ हजार ५०० रेमडेसिवीरच्या कुप्या २१ एप्रिल ते ९ मे या कालावधीत मिळणार आहेत. यातील ३ लाख ४९ हजार ०७० कुप्यांचा साठा खासगी आणि शासकीय रुग्णालयात वितरित केला आहे. तर सुमारे ४० हजार कुप्यांचा साठा दोन दिवसांत वितरित केला जाईल.