03 December 2020

News Flash

करोनाच्या २२८ व्या दिवशी रुग्ण संपर्कातील लोक शोधण्यात महाराष्ट्र अपयशी!

ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण आणखी कमी होऊन ४.२ टक्के एवढे झाल्याची माहिती

प्रातिनिधीक छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण सापडला त्याला २२८ दिवस झाले असून, अजूनही एका करोना रुग्णामागे संपर्कातील किमान २० लोकांना शोधण्याच्या आदेशाचे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. राज्यातील ३१ जिल्ह्यात सरासरी ४.२ लोकांनाच शोधण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ३१ जिल्ह्यात आरोग्य विभागाने करोना रुग्ण संपर्कातील किती व्यक्ती शोधल्या? याचा आढावा घेतला तेव्हा ३१ जिल्ह्यात करोना रुग्णाच्या संपर्कातील सरासरी १० लोकांना शोधण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने २१ सप्टेंबर रोजी पुन्हा राज्यातील सर्व जिल्ह्यात रुग्ण संपर्कातील किती लोकांना शोधण्यात आले याची पाहाणी केली. या पाहाणीत गंभीर रुग्णांच्या ( हाय रिस्क) संपर्कातील सरासरी अवघे ४.६ लोकांचाच शोध घेतल्याचे, तर सौम्य लक्षणे असलेल्या ७.२ लोकांचा शोध घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण आणखी कमी होऊन ४.२ टक्के एवढे झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबईसह राज्यात एकीकडे रुग्णबरे होण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णसंख्याही कमी होताना दिसत आहे. मात्र रुग्ण संपर्कातील लोकांना शोधण्याबाबत जेवढी काळजी घेणे आवश्यक आहे, तेवढी ती घेतली जात नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘माझे आरोग्य माझी जबाबदारी’ या योजनेमुळे अनेक रुग्ण शोधता आले तसेच कोमॉर्बिड लोकांचा शोध लागून, त्यांना सावध करता आल्याचे आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.

सातारा, सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, यवतमाळ आदी जिल्ह्यात एका करोना रुग्णामागे ४ ते ७.८ एवढेच संपर्कातील लोकांना शोधण्यात आल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. यातील गंभीर बाब म्हणजे ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर या करोना रुग्णांची मोठी संख्या असलेल्या भागात योग्य काळजी न घेतल्यास करोना पुन्हा वाढू शकतो अशी भीती डॉक्टरांना वाटते. महाराष्ट्रात आतापर्यंत करोनाचे ४३,०१५ बळी गेले आहेत, तर मुंबईत १०,००८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोना मृत्यूंपैकी एकट्या मुंबईत ८.५ टक्के मृत्यू झाले असून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर तसेच सॅनिटाइझेनचे योग्य पालन न झाल्यास मुंबईचे चित्र पुन्हा बदलू शकते, असे टास्क फोर्सच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

प्रामुख्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर काळजी मुंबईकरांनी घ्यावी, असे आवाहन राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी केले आहे. मुंबईत लोक आज मास्क घालत नाहीत ही गंभीर बाब आहे. चीनच्या वुहानमध्ये नऊ रुग्ण सापडताच त्यांनी पुन्हा सर्वांच्या चाचण्या केल्या. दक्षिण कोरियात दोनदा देशभरात सर्वांच्या चाचण्या केल्या. त्या पार्श्वभूमीवर युरोपातील देशांनी चाचण्यांपासून सर्वच गोष्टीत निष्काळजीपणा केल्याचा फटका आता त्या देशांना बसत असल्याचे डॉ. ओक म्हणाले. या देशांत आता संचारबंदी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याकडेही चाचण्या वाढविण्याची मोठी गरज आहे. टास्क फोर्स म्हणून आम्ही सतत आग्रह धरला असून मास्क, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटाइझेशन याचे कठोर पालन आवश्यक असल्याचे डॉ संजय ओक म्हणाले. त्याचप्रमाणे रुग्ण संपर्कातील २० लोकांना शोधणे महत्वाचे असून येथे आपण कमी पडत असल्याचे डॉ.ओक यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील बहुतेक जिल्हात रुग्ण संपर्कातील लोकांचा पुरेसा शोध घेतला जात नाही. ठाण्यात एका करोना रुग्णामागे अवघे ३.९ रुग्ण शोधण्यात आले, तर ज्या कोल्हापूरवासीयांनी मास्क घालणे, सॅनिटाइजरचा वापर वा डिस्टसिंगचे पालन धुडकावून लावले त्या कोल्हापूरात अवघे ३.५ संपर्कातील लोक शोधले गेले. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ज्या पुण्यात आढळून आले तेथे तरी यंत्रणेने एका गंभीर करोना रुग्णाच्या संपर्कातील २० लोकांना शोधणे अपेक्षित असताना, सध्या पुणे तिथे सारेच उणे ही अवस्था असून हाय रिस्क असलेले केवळ ३.१ लोक शोधण्याचे दिसून येते. पुण्यात वा ठाण्यात तसेच कोल्हापूर मध्ये लोक मास्क लावायला तयार नाहीत की अन्य कोणते निर्बंध पाळताना दिसतात, अशा परिस्थितीत एकटा आरोग्य विभाग काय करणार? असा अस्वस्थ प्रश्न आरोग्य विभागाचे डॉक्टर विचारताना दिसतात. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात हाय रिस्कचे केवळ २.८ रुग्ण शोधण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमध्ये एका करोना रुग्णामागे सरासरी ४.२ संपर्कातील लोक शोधण्याचे काम होणार असेल, तर करोनाला रोखणार कसे? हा कळीचा प्रश्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:01 pm

Web Title: maharashtra fails to find people who connected with patients on 228th day of corona msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 “रोहित पवारांनी समाजकारण नाही तर धंदा केला”
2 …पण, राज्य सरकार पडणार नाही – खडसे
3 VIDEO: माणुसकीचा खरा अर्थ जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी कुमकर
Just Now!
X