राज्यपाल आणि ठाकरे सरकारमधीव वादात आज अजून एका वादाची भर पडली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देहरादूनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले असता सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे राज्यपाल खासगी विमानाने देहरादूनला पोहोचले. राज्यपालांना विमान प्रवासाची परवानगी न दिल्याने भाजपा नेते आक्रमक झाले असून ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. दरम्यान देहरादूनला पोहोचल्यानंतर राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी देहरादूनला जाणार होते. देहरादूनला जाण्यासाठी राज्यपाल मुंबई विमानतळावर पोहोचले असता उड्डाणाची परवानगी मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं. यामुळे राज्यपालांना पुन्हा परतावं लागलं. यावर प्रतिक्रिया देताना राज्यपालांनी सांगितलं की, “काही कारणाने ते विमान मिळालं नाही म्हणून दुसऱ्या विमानाने प्रवास केला. एक विमान नाही आवडलं तर दुसऱ्या विमानाने प्रवास केला”. यावेळी त्यांनी खासगी दौरा असल्याने परवानगी दिली नाही का? अशी विचारणा करण्यात आली असता “आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो?” अशी विचारणा त्यांनी केली.

मुख्यमंत्री सचिवालयाचं स्पष्टीकरण-
या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री सचिवालयाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्यपाल सचिवालयानं विमान उपलब्धतेची खातरजमा करायला हवी होती असं मुख्यमंत्री सचिवालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच विमान उड्डाणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी पाठवण्यात आला होता अशी माहिती देण्यात आली आहे.

राजभवनाकडून खुलासा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सरकारी कामासाठी उत्तरखंडला जाणार होते. लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२ व्या इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या व्हॅलेडिक्टरी प्रोग्रॅमला ते हजेरी लावणार होते. राज्यपाल ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर पोहोचले होते. राज्यपाल सचिवालयानं २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून विमान प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केली होती. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही कळवण्यात आलं होतं. गुरुवारी राज्यपाल ठरलेल्या वेळेनुसार विमानतळावर पोहोचले आणि विमानात बसले देखील. मात्र, तेव्हा राज्यपालांना सरकारी विमानातून प्रवासासाठी परवानगी मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं. यानंतर राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार देहराडूनला जाण्यासाठी खासगी विमानाची तिकीटाचं बुकिंग करण्यात आलं. आणि ते १२. १५ च्या विमानानं देहराडूनसाठी रवाना झाले.