संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई: गेल्या दोन दशकात मृत्यूच्या वेगवेगळ्या कारणांमध्ये हृदयविकाराने अग्रक्रम मिळवला आहे. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण बनत असल्याचे लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने तब्बल ८० कोटी रुपये खर्चून आठ मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक कॅथलॅब सेंटर सुरु करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.

Thane district, schools are now tobacco free, health departments, students
ठाणे जिल्ह्यातील ९३६ शाळा तंबाखूमुक्त
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
Two nurses have been immediately suspended for transfusing blood of wrong blood group to two patients in Aundh District Hospital Pune news
रुग्णांच्या जिवाशी खेळ महागात! जिल्हा रुग्णालयातील दोन परिचारिका तत्काळ निलंबित
Independent rehabilitation system for mentally ill patients Mumbai print news
मानसिक आजारमुक्त रुग्णांसाठी स्वतंत्र पुनर्वसन व्यवस्था!

देशात तसेच महाराष्ट्रात हृदयविकाराने मरण पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असून या रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्यास त्यांना वाचवणे शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे. यासाठी दोन महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाने ‘स्टेमी’ नावाचा उपक्रम राबवला. यात विभागाच्या १२० रुग्णालयात ईसीजी मशिन देण्यात आले आहे. हृदयविकाराची तक्रार असलेल्या रुग्णाचा ईसीजी काढून हृदयविकाराची समस्या आढळून आल्यास तात्काळ योग्य ती औषध योजना केली जाते. तसेच रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून २४ तासात नजीकच्या हृदयउपचार केंद्रात हलवले जाते. याबाबत आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार यांनी सांगितले की १९९० दशकात वेगवेगळ्या आजारांनी मरण पावणाऱ्यांमध्ये हृदयविकाराने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण हे सातव्या क्रमांकावर होते, मात्र २०१६ मध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचे कारण प्रथम क्रमांकाचे बनले. वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या दोन दशकात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून यावरील उपचार खर्चिक असल्याने आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे बनले होते.

आरोग्य विभागाच्या नाशिक जिल्हा रुग्णालयात सध्या एक कॅथलॅब कार्यरत असून या ठिकाणी हृदयविकार रुग्णांची अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसह आवश्यक उपचार केले जातात. याशिवाय अमरावती जिल्हा रुग्णालयीत नवीन कॅथलॅब बसविण्याचे काम सुरु असले, तरी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला असताना हृदयविकार रुग्णांवरील उपचाराला प्राधान्य देण्यास सांगितले. यानुसार आरोग्य विभागाने राज्यातील आठ मध्यवर्ती ठिकाणच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॅथलॅब केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची योजनाही तयार केली आहे. या सुसज्ज कॅथलॅब योजनेसाठी सुमारे ८० कोटी रुपये लागणार असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या कॅथलॅबमध्ये हृदयविकार रुग्णांवर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसह आवश्यक उपचार करण्यासाठी मानद हृदयविकार तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. खाजगी रुग्णालयांत आज अँजिओप्लास्टीसाठी किमान दोन ते चार लाख रुपये खर्च येतो. गोरगरीब रुग्णांना हा खर्च परवडणारा नसल्याने आरोग्य विभागाच्या रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी योजना तसेच अन्य योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातील. जे रुग्ण शासनाच्या कोणत्याही योजनेत बसणारे नसतील त्यांनाही अत्यंत माफक दरात उपचार केले जातील असे या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच आरोग्य विभागाची ‘स्टेमी’ या योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. सध्या १२० रुग्णालयात ईसीजी मशिन व प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. आगामी काळात जवळपास सर्व ग्रामीण रुग्णालयात ईसीजी मशिन बसवून हृदयविकाराच्या रुग्णांना वेळीच उपचार मिळून जीव वाचावा, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

जीवनशैलीतील बदलांमुळे तसेच ताणतणावामुळे एकीकडे मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत असून यातूनच हृदयविकाराच्या रुग्णांचेही प्रमाण वाढत असून योग्य जीवनशैलीबाबतही आरोग्य विभागामार्फत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.