25 February 2021

News Flash

“आता मुंबई-महाराष्ट्रातील देशी ओवेसी कोण? ते लवकरच कळेल”

शिवसेनेचा भाजपासह ओवेसींवर हल्लाबोल

संग्रहित छायाचित्र

खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षावर सातत्यानं भाजपाची बी टीम असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत असतो. भाजपाविरोधी पक्षाकडून केल्या जाणाऱ्या या आरोपाला भाजपा खासदारानं अप्रत्यक्षपणे दुजोरा दिल्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यावरून शिवसेनेनं भाजपा नेतृत्वासह असदुद्दीन ओवेसी यांना खडेबोल सुनावले आहेत. “ओवेसी यांनी बिहारमध्ये भाजपाची मदत केली. आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसंच होईल,” असं विधान भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी केलं होतं. साक्षी महाराज यांच्या विधानाचा हवाला देत शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपा नेतृत्वासह असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे.

“ओवेसी साहेबांची पोलखोल भारतीय जनता पक्षानेच केल्याने काही प्रमाणात दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे. ओवेसी मियाँचे ‘एमआयएम’ पात्र हे मुसलमानांचे तारणहार नसून, भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र असल्याच्या शंका लोकांना होत्याच, पण भाजपाचे प्रमुख नेते साक्षी महाराज यांनी आता ठणकावून खरे सांगितले आहे की, ”होय, मियाँ ओवेसी हे भाजपाचेच पोलिटिकल एजंट असून ओवेसीच्या मदतीनेच आम्ही निवडणुका जिंकत असतो.” साक्षी महाराज म्हणतात, ‘ओवेसी मदतीला होते म्हणून आम्ही बिहार जिंकले. आता ओवेसीसाहेब आम्हाला प. बंगाल आणि उत्तर प्रदेशातही मदत करतील. ओवेसींची मदत भाजपास होते ही भगवंताचीच कृपा आहे. परवरदिगार भगवंत ओवेसींना अधिकाअधिक शक्तिमान करो!’ साक्षी महाराजांनी भाजपाचे अंतरंगच उघडून दाखवले. कमळाच्या फुलातील कुंजबिहारी हे अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, आडवाणी, मोदी, अमित शहा असावेत या भ्रमातून साक्षी महाराजांनी लोकांना बाहेर काढून कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ ओवेसी आहेत हेच दाखवले आहे,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

“…म्हणजे हिंदुत्वविरोधी शक्तीचा वापर करूनच हिंदुत्वाचा जयजयकार करायचाय”

” मुसलमानांची मते ‘सेक्युलर’छाप राजद, समाजवादी पार्टी किंवा काँग्रेसकडे जाऊ नयेत, त्यांना ही हुकमी मते मिळू नयेत यासाठी मियाँ ओवेसी यांचा पद्धतशीर वापर केला जातो. बिहारच्या निकालानंतर हे स्पष्टच झाले. राष्ट्रीय लोकदल, काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी ओवेसींवर गंभीर आरोप केले आहेत. मुस्लिम वोट बँक कापून भाजपास फायदा व्हावा यासाठीच मियाँ ओवेसी यांची धडपड असल्याचा आरोप हे लोक करीत होते तोपर्यंत ठीक होते, पण आता भाजपाच्या गोटातूनही तेच टोले जाहीरपणे लगावले गेले आहेत. प. बंगालात मियाँ ओवेसी यांनी जे कार्य सुरू केले आहे, त्यामुळे भाजपाचे चेहरे आनंदाने फुलू लागले आहेत. ओवेसी यांच्या सहकार्याने भाजपास बंगाल जिंकायचा आहे. म्हणजे हिंदुत्वविरोधी शक्तीचा वापर करूनच हिंदुत्वाचा जयजयकार करायचा आहे,” असा टोला शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.

ओवेसींना सल्ला वजा टोला

“मियाँ ओवेसी हे एक निष्णात कायदेपंडित आहेत. त्यांचे जे काही राजकारण आहे ते त्यांच्यापाशी. मुसलमानांचा जीवनस्तर सुधारावा, मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या जीवनातील अंधार व धर्मांधता दूर व्हावी यासाठी ओवेसींसारख्या विद्वानांनी काम केले तर राष्ट्राचे भले होईल; पण हिंदुस्थानच्या पोटात वाढणाऱ्या दुसऱ्या पाकिस्तानला अधिक जहरी धर्मांध बनवून ते राजकारण करीत आहेत. त्यांचे राजकारण हिंदुद्वेषावर आधारित आहे. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मधल्या काळात ज्याप्रकारची जहाल वक्तव्ये केली ती धक्कादायक आहेत. ’24 कोटी मुसलमान 100 कोटी हिंदूंना भारी पडतील. पोलिसांना बाजूला करा, मग बघा काय करून दाखवतो ते.’ अशी बेताल भाषा ओवेसी यांचे बंधू जाहीरपणे करत होते. आता हेच ओवेसी भाजपाच्या विजयरथाचे मुख्य चाक बनले आहे,” अशी टीका शिवसेनेनं ओवेसी यांच्यावर केली आहे.

मुंबई महापालिकेत ‘गुप्त शाखे’शी हातमिळवणीचा कट

“भारतीय जनता पक्ष इतरांना नैतिकतेचे व हिंदुत्वाचे धडे देत असतो. आमचेच राष्ट्रीयत्व किंवा हिंदुत्व कसे शुद्ध बनावटीचे असा त्यांचा दावा असतो. त्या शुद्ध हिंदुत्वात ओवेसीच्या उंगल्याही बुडत असतात, असा टणत्कार साक्षी महाराजांनी केला आहे. ओवेसी ही जशी त्यांची एक गुप्त शाखा आहे तशा गुप्त शाखा इतरत्र आहेतच. पाडा, झोडा व विजय मिळवा हेच त्या गुप्त शाखांचे धोरण आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भगवा उतरविण्याची मस्तवाल भाषा याच ‘गुप्त शाखे’शी हातमिळवणी करून केलेला कट दिसतोय. आता मुंबई-महाराष्ट्रातील देशी ओवेसी कोण? ते लवकरच कळेल. साक्षी महाराजांनी भंडाफोड केलाच आहे. त्यांनी अनवधानाने सत्य जाहीर केले. सध्याच्या काळात सत्य बोलणे हा गुन्हाच आहे. साक्षी महाराज धाडसाने सत्य बोलले. भाजपचा परवरदिगार भगवंत साक्षी महाराजांना अधिक शक्तिमान करो. शक्तिमान होण्याची मक्तेदारी काय फक्त मियाँ ओवेसींचीच आहे?,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपा आणि ओवेसींना लक्ष्य केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 7:50 am

Web Title: maharashtra politics shivsena bjp sanjay raut sakshi maharaj asaduddin owaisi bmc election bmh 90
Next Stories
1 पालघर, बोईसरमध्ये कायद्याचा बडगा
2 मासे सुकविण्यासाठी ऐतिहासिक किल्ल्याचा वापर
3 पालिकेचा औषधसाठा चक्क सार्वजनिक शौचालयात
Just Now!
X