बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडतोय. तसेच पुढील दोन दिवसांमध्ये राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच या सततच्या पावसाने मुंबईकर, पुणेकर, नाशिकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली आहे. कोयना, भंडारदरा यासारखी महत्वाची धरण ओव्हर फ्लो झाली आहे. कोयनाचे सहा दरवाचे २.६ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. तर पुण्यामधील पानशेत, वरसगाव, भाटघर धरणं १०० टक्के भरली आहेत.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, तीन धरणं १०० टक्के भरली…

पुणे पसिरसातील खडकवासला धरण ९७ टक्के भरलं आहे. पानशेत, भाटघर आणि वरसगाव धरणं १०० टक्के भरली असून टेमघर धरण ९९ टक्के भरलं आहे. त्यामुळेच दरवर्षी पाणी टंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या पुणेकरांना या वर्षी तरी पाण्याची चिंता करण्याची गरज लागणार नसल्याची चिन्हं दिसत आहेत. खडकवासलामधून ६ हजार ८४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय. विसर्गामुळे पाणी पातळी तुलनेने मोठ्या प्रमाणात वाढणार नसली तरी नदीकाठ परिसरात सतर्क राहावे, असंही महापौरांनी स्पष्ट केलं आहे.

कोयनाचे सहा दरवाजे उघडले

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठीही सर्वत्र संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळेच कोयना धरणाचे दरवाजे २.६ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहे. या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोयना काठच्या गावांना सतर्कचे इशारा देण्यात आलाय.

नाशिकमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग…

नाशिक जिल्ह्यामधील धरणांमधूनही मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक म्हणजेच १३ हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे. गंगापूर धरणातून १ हजार ५०० तर दारणा धरणातून १२ हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे. कडवा धरणामधून २ हजार २०० आणि आळंदी धरणातून ३० क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. याशिवाय वालदेवी धरणातून १३० क्युसेक पाणी सोडलं आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : १० हजार क्युसेक वेगाने १ टीएमसी पाणी धरणातून सोडलं म्हणजे नेमकं किती लिटर पाणी सोडलं?

भंडारदरा भरलं…

उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असणारे भंडारदरा धरणही भरलं आहे. धरणामधून साडेतीन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. अकोले, संगमनेर, रहाता,श्रीरामपूर या तालुक्यांतील हजारो एकर शेतीला पाणी पुरविणाऱ्या या धरणावर अनेक साखर कारखाने, दूध संघ यांचे भवितव्य या धरणावर अवलंबून आहे.

अजून काही दिवस पाऊस

धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असता तरी अजून काही दिवस पाऊस कायम राहणार असल्याने धरणांमधील पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे.  पोषक वातावरणामुळे राज्यात पुढील दोन दिवस सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्याच्या काही भागांत १३ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, कोकण आणि पश्चिाम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत रविवारी पावसाने हजेरी लावली.

हा पाऊस का पडतोय?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे गुजरातच्या परिसरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मोसमी पावसाची आस असलेला हा पट्टा गुजरातपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरला राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

रविवारी जोरदार बॅटिंग, आता पुढील काही दिवस कोसळणार…

रविवारी कोकण विभागात अनेक ठिकाणी पाऊस झाला, मुंबई, रत्नागिरीतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक भागांत पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदी भागांत हलका पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी आदी घाटमाथ्यावरील भागांमध्ये १०० ते १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण विभागात आणखी तीन, तर मध्य महाराष्ट्रात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात  दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस असेल.

वारा आणि पावसाचा अंदाज…

पश्चिाम किनारपट्टीवर पुढील ३ ते ४ दिवस जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह कोकणात मुसळधार ते अति मुसळदार पाऊस पडेल. सोमवारी पालघर, ठाणे, रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. रायगड येथे तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची तर मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे २७८९.८ मिमी आणि कुलाबा येथे २१४९.५ मिमी एकूण पावसाची नोंद झाली.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १४ ते १५ सप्टेंबरपर्यंत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट विभागांत १४ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. १३ सप्टेंबरला जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. या दिवशी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.

पुण्यातील धरणांची स्थिती

पानशेत १०० टक्के भरलं
वरसगाव धरण १०० टक्के भरलं
भाटघर १०० टक्के भरलं
टेमघर धरण ९९ टक्के भरलं
खडकवासला ९७ टक्के भरलं

नाशिकमध्ये कोणत्या धरणातून किती विसर्ग?

दारणा धरणातून १२ हजार क्युसेक
गंगापूर १ हजार ५००
नांदूर मध्यमेश्वर १३ हजार
कडवा २ हजार २००
आळंदी ३०
वालदेवी १८३