राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत आता पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दररोज मोठ्याप्रमाणावर करोनाबाधित वाढत असुन, करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांध्ये राज्यभरात ६ हजार ११२ नवे करोनाबाधित वाढले असुन, ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८७ हजार ६३२ वर पोहचली आहे.

याशिवाय मागील २४ तासांमध्ये राज्यात २ हजार १५९ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आजपर्यंत राज्यात १९ लाख ८९ हजार ९६३ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५. ३२ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात अॅक्टिव्ह केसेसची संख्या ४४ हजार ७६५ असुन, आजपर्यंत ५१ हजार ७१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४८ टक्के एवढा आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५५,८८,३२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ८७ हजार ६३२ (१३.३९ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ८७ जण गृहविलगीकरणात आहेत, तर १ हजार ५८८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

लॉकडाउन वाढवायचे अधिकार कोणाला?; अजित पवारांनी केलं स्पष्ट

राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वर काढत असून अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यासंबंधी राज्य सरकार विचार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिस्चार्ज मिळणाऱ्यांच्या तुलनेत करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असणं चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला लॉकडाउनची मुभा देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.