News Flash

Maharashtra Unlock : ‘अजून अनलॉक केलेला नाही’, विजय वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर राज्य सरकारचं स्पष्टीकरण!

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात जिल्ह्यांची ५ टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार अनलॉक करत असल्याचं जाहीर केलं. मात्र, लगेचच

महाराष्ट्रात लॉकडाऊन

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्य अनलॉकची घोषणा केली. त्यामध्ये राज्यातल्या सर्व जिल्ह्यांची वर्गवारी देखील सांगितली. या घोषणेनुसार उद्यापासून म्हणजेच शुक्रवार ४ जून पासून अंमलबजावणी सुरू होईल, असं देखील जाहीर केलं. मात्र, त्यानंतर आता राज्य सरकारनंच हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. करोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, असं राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मार्गदर्शक सूचना जाहीर होतील

‘ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील’, असं देखील आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अजून प्रस्ताव विचाराधीन!

‘अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल’, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

Maharashtra Unlock : राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक – विजय वडेट्टीवार

वडेट्टीवारांनी केली होती ५ टप्प्यांची घोषणा!

गुरुवारी दुपारी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्ह्यांची पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी या आधारावर ५ गटांमध्ये विभागणी केल्याची घोषणा केली. यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली असणाऱ्या आणि २५ टक्क्यांच्या खाली ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन पूर्णपणे उठवल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यासोबतच, या पाचही गटांमध्ये ताज्या आकडेवारीनुसार कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, त्याची यादी देखील त्यांनी यावेळी जाहीर केली. मात्र, आता राज्य सरकराने हा निर्णयच अजून अंतिम झालेला नसल्याचं जाहीर केल्यामुळे यावरून आता मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्ह्यांची ५ गटांत वर्गवारी!

पहिला गट – पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

दुसरा गट – दुसऱ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.

तिसरा गट – तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

चौथा गट – चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

पाचवा गट – पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे. वरील ४ टप्प्यांमध्ये नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील गटात करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 6:40 pm

Web Title: maharashtra unlock latest news restrictions not been lifted yet says health ministry after vijay wadettiwar announcement pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 राज्यात ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’
2 भविष्यात काँग्रेसला महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ येणार; अमित देशमुखांनी व्यक्त केला विश्वास
3 राज्यातील महाविकासआघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण… : अमित देशमुख
Just Now!
X