पुढील दोनतीन दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात २६ ते २८ डिसेंबरदरम्यान थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या देशात पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशात थंडीची लाट सुरू असून तेथून वाहणारे वारे महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे.

उद्यापासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व नगर जिल्ह्यांत लाटेचा परिणाम जाणवेल. ओखी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, स्थानिक पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबरनंतर थंडी गायब झाल्याचे चित्र होते. पुणे शहराचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले होते. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडील थंड प्रवाह राज्याकडे येत असल्याने राज्याच्या तापमानात मोठी घट होत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भात थंडी आहे. विदर्भापाठोपाठ ही थंडी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागातही वाढत आहे. पुणे शहरामध्ये रविवारपासून किमान तापमानात घट नोंदविली जात आहे.

पुढील तीन ते चार दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे, तर तापमान १० अंशांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.