कोल्हापूर महापालिकेवर वर्षांच्या अखेरीस महिलाराज अवतरणार आहे. महिलांची संख्या सभागृहात प्रथमच निम्म्याहून अधिक असल्याने पुरूषी अहंकाराला धक्का बसणार आहे. मात्र याच वेळी महिलांची संख्या वाढल्याने महापालिकेतील कारभाऱ्यांचे मात्र फावणार आहे.
राजकारणात सुरूवातीपासूनच पुरूषांचा वरचष्मा राहिला आहे. महिलांना संधी मिळायची ती राजकारण्यांच्या दयाबुध्दीनेच. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायतराजच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का वाढावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. ग्रामपंचायतीपासून ते महापालिका निवडणुकीपर्यंत महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. तेव्हापासून गेली दोन तपे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात महिला सदस्यांचे प्रमाण वाढले आहे. महिला सदस्यांची संख्या वाढली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थात अजूनही पुरूषी अहंकाराचा वरचष्मा कायम आहे. कारभारी म्हणतील तीच पूर्वदिशा ठरत आहे. सत्ता प्रक्रियेमध्ये महिलांचे प्रमाण वाढले असले तरी निर्णय प्रक्रियेपासून मात्र त्या अद्यापही वंचित आहेत. सभागृहात कारभाऱ्यांच्या इशाऱ्याने आणि प्रभागातील कामामध्ये पतीराजाच्या निर्देशाने नगरसेविका काम करतात, असाच आजवरचा अनुभव आहे. यास अपवाद ठेवून प्रभागात व सभागृहात स्वतचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या सदस्या आहेत, पण त्यांचे प्रमाण मात्र हाताच्या बोटावर मोजता येईल इतपतच.
कोल्हापूर महापालिकेची आगामी निवडणूक महिलांचा टक्का आणखी वाढवणारी आहे. ८१ सदस्यांच्या सभागृहात निम्म्याहून एक जादाच म्हणजे ४१ महिला सदस्या असणार आहेत. यामुळे पालिकेत महिलाराज पर्वास सुरूवात होणार आहे. म्हटले तर ही बाब महिलांना राजकारणात आपले अस्तित्व अधिक ठळक करण्याची आहे. आणि दुसरीकडे, ही बाब महिलांनाच अडचणीत आणणारीही आहे. कारण महापालिका कामकाजात नगरसेविकांचा आवाका, समज ही नगरसेवकांच्या तुलनेत सुमार असल्याचा एकंदरीत अनुभव आहे. यामुळे सभागृहात नगरसेवकांची  संख्या कमी असतानाही महापालिका कामकाजात वर्चस्व गाजविणाऱ्या नगरसेवकांची हुकमत वाढणार आहे. विशेषत कारभारी नगरसेवकांना मोकळे रान मिळणार आहे. खरे तर सभागृहातील महिलांचे प्रमाण ५० टक्क्यापेक्षा अधिक होणार असल्याने या संधीचा लाभ घेऊन नारीशक्तीने एकवटण्याची गरज आहे. हे प्रमाण लक्षात घेऊन निवडणूक काळात आणि तद्नंतरही आपले अस्तित्व अधिक ठळक करण्याची महिलांना नामी संधी आहे.