येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कारखाना व्यवस्थापन आणि अंतर्गत कामगार संघटना यांच्यात वेतनवाढीविषयी गेल्या महिन्यात झालेल्या सामंजस्य कराराला शनिवारी कामगारांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली. या करारानुसार कामगारांच्या वेतनात सरासरी ९,४०० रूपयांनी वाढ होणार असून, उत्पादनात १८ टक्के वाढीची हमी देण्यात आली आहे. वाहन उद्योग क्षेत्रावर मंदीचे सावट असताना महिंद्राकडून घसघशीत वेतनवाढ देण्यात आल्याची प्रतिक्रिया औद्योगिक वर्तुळात उमटत आहे.
महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रा अंतर्गत कामगार संघटनेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शिरीष भावसार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सरचिटणीस प्रवीण शिंदे यांनी २८ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या सामंजस्य करार कामगारांसमोर मांडला. त्यानुसार कामगारांच्या वेतनात सरासरी ९,४०० रूपये वाढ होईल. तीन महिन्यांपूर्वी कायमस्वरूपी म्हणून रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनात ७,३०० रूपयांनी वाढ होऊन त्यांचे वेतन आता २२,००० रूपयांवर जाईल. पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कामगारांचे वेतन ११,३०० रूपयांनी वाढून ते ४२ हजार रूपयांवर जाणार असल्याचे सांगण्यात आले. वेतनवाढ मिळविताना कामगार संघटनेने १८ टक्के उत्पादन वाढ देण्याची हमी दिली आहे. सध्या कारखान्यात आठ तासांच्या एका सत्रात १५० मोटारींचे उत्पादन केले जाते. नव्या करारानुसार मोटारींची ही संख्या १८० वर जाईल. म्हणजे दिवसाला मोटारींचे एकूण उत्पादन ५७० ते ५८० वर जाणार असल्याचे सांगण्यात आले. कामगारांनी काही मुद्यांवर हरकती नोंदविल्या. काहींनी अधिक तपशील जाणून घेतला. करारातील मसुद्यावर चर्चा झाल्यावर त्यास मंजूरी देण्यात आली.
सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यामुळे कामगार संघटना आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात करारनामा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामगार संघटनेने उत्पादनात वाढ करण्याची हमी दिल्यामुळे महिंद्रा कारखान्यावर अवलंबून असणारे छोटे-मोठे ४५० कारखान्यांना उत्पादनात वाढ करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.