अलिबाग : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अलीबाग सत्र न्यायालयाने सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.राजन गौरीशंकर चौधरी असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर घटना १ एप्रिल २०१४ रोजी कामोठे तालुका पनवेल येथे घडली होती. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३७६, ३५४, ५०६, तर पॉस्को अर्थात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमच्या कलम ३, ४, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी याने इयत्ता तिसरीत असलेल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून अलिबाग सत्र न्यायालयासमोर दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश- २ श्रीमती एम व्ही मोहिते यांच्या न्यायालयात झाली. सरकारी अभिव्योक्ता म्हणून अश्विनी बांदिवडेकर- पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
यात पीडित मुलगी, फिर्यादी, तपासी अंमलदार तथा वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी राजन चौधरी यास बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले.
आणि त्याला पाच हजार रुपये दंड आणि सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.