सध्या आंब्यांचा हंगाम ऐन भरात आहे. कोकणातील देवगडचा हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. कोकणातील हापूस आंबा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि विदेशातही प्रसिद्ध आहे. देशभरातील हापूसप्रेमी त्याचा स्वाद चाखण्यास उत्सुक असतात. तुमचा आवडता देवगड हापूस थेट बागेतून तुम्हाला घरबसल्या मिळू शकतो, तोही मोफत. यासाठी तुम्हाला ५० हजार रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं ही अनोखी योजना अंमलात आणली आहे. याला त्यांनी ‘मँगो बाँड’ असे नाव दिले आहे. या योजनेअंतर्गत ५० हजार रूपयांचा मँगो बाँड तुम्हाला खरेदी करावा लागणार आहे. बाँड खरेदी केल्यानंतर पाच वर्ष मोफत ५ हजार रुपयांचे आंबे घरपोच मिळणार आहेत.

मँगो बाँड या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला सुमारे ५० हजार रूपयांचा मँगो बाँड खरेदी करावा लागणार आहे. या रकमेवर गुंतवणूकदाराला वार्षिक सुमारे १० टक्के व्याज म्हणून दरवर्षी पाच हजार किंमतीचे हापूस आंबे घरपोच केलं जाणार आहेत. देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक ओमकार सप्रे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मँगो बाँडला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत देशभरातील ३०० लोकांनी या बाँडसाठी नोंदणी केली आहे. जवळजवळ संस्थेकडे एक कोटी ३० लाख रूपयांपर्यंतची ठेव जमा झाली आहे. महाराष्ट्रासह गुजराज, राजस्थान आणि दिल्लीसारख्या ठिकाणाहून बाँडची नोंदणी केली जात आहे. तीन प्रकारचे देवगड हापूस आंबे उपलबद्ध आहेत. आमच्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांना घरपोच दिले जाणारे हापूस बाजारभावापेक्षा २० टक्के कमी दराचे असल्याचे ओमकार सप्रे यांनी सांगितले.

कोकणातील फक्त देवगड तालुक्यात तीन हजारांपेक्षा जास्त शेतकरी ५० हजार एकरमध्ये आंब्याचे उत्पादन घेतात. यामधून वर्षाला ५५० ते ६०० कोंटींचे वार्षिक उत्पादन या शेतकऱ्यांना मिळते. मात्र, गेल्यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि बाजरभावामुळे आंब्याला हवा तसा भाव मिळाला नाही. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.