मनमाड पोलिसांनी लग्न करुन पुरुषांना गंडा घालणाऱ्या महिला लखोबा लोखंडेला अटक केली आहे. महिलेला अटक केल्यानंतर चौकशी केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. कारण महिलेने एक, दोन नाही तर तब्बल १० पुरुषांना लग्न करुन गंडा घातला असल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे तिने फसवलेल्यांपैकी एका पतीनेच भांडाफोड केल्यानं तिचं खरं रुप समोर आलं. पोलिसांनी महिलेकडून ९० हजाराचा माल आणि २४ हजाराच्या बांगड्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी महिलेसहित चौघांना अटक केली आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्नी फोनवर वारंवार बोलत असल्याने तिच्या सध्याच्या पतीला संशय आला आणि त्याने तिचा फोन रेकॉर्डवर टाकला. रेकॉर्ड झालेले कॉल ऐकत असताना पत्नी एका व्यक्तीशी अत्यंत प्रेमाने म्हणजे पती असल्याप्रमाणेच बोलत असल्याने त्याला संशय आला. त्याने संबंधित व्यक्तीला फोन करुन आपण कोण अशी विचारणा केली असता मी त्या महिलेचा पती असल्याचं त्याने सांगितलं आणि येथेच महिलेचं बिंग फुटलं.

महिलेच्या दोन्ही पतींमध्ये ही आपलीच पत्नी असल्याचा दावा होत भांडण सुरु झालं. यानंतर त्यांनी लग्नाचे फोटो शेअर केले असता आपल्या दोघांचीही फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर महिलेच्या पतीने थेट मनमाड पोलीस स्टेशन गाठत फसवणूक झाल्याची तक्रार केली.

पोलिसांनी महिलेला अटक करुन चौकशी केली असता आतापर्यंत तिने दहा पुरुषांना फसवलं असून अकरावं लग्न करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं. महिलेने जळगाव, शिर्डी, अहमदनगर येथील पुरुषांना फसवलं आहे. पोलिसांनी सापळा रचत तिच्या सहकाऱ्यांनाही अटक केली आहे. तिच्याकडून मुद्देमाल जप्त केला असून चौकशी सुरु आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmad police arrest woman marry 10 people and cheated
First published on: 25-09-2018 at 15:12 IST