News Flash

मनमाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड यांची आत्महत्या

गेल्या काही दिवसांपासून छाजेड हे विविध आजारांनी त्रस्त होते.

शिवसेनेच्या स्थापनेपासून शहरात सक्रिय असलेले ज्येष्ठ शिवसैनिक माजी नगराध्यक्ष व माजी शहरप्रमुख राजाभाऊ छाजेड (५६) यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली. गेली ३७ वर्षे मनमाडकरांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी लढा दिला होता. सायंकाळी उशिरा अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अन्त्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून छाजेड हे विविध आजारांनी त्रस्त होते. तरीदेखील शिवसेनेच्या उपक्रमात ते सक्रिय होते. बुधवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी ते घराबाहेर पडले. निवासस्थानाजवळ नगरचौकी रोडजवळ असलेल्या शेतातील विहिरीत उडी मारून त्यांनी जीवनयात्रा संपविली. हे वृत्त समजताच शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. शिवसेनेच्या विचाराने प्रभावित झालेले छाजेड यांनी १९८५ साली शिवसेनेचे शहरप्रमुख झाले. तब्बल १८ वर्षे ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. मनमाड तालुका, मनमाड औद्योगिक वसाहत याबरोबरच शहराच्या ज्वलंत प्रश्नांसाठी रास्ता रोको, रेल रोको आंदोलनात त्यांचा सहभाग होता.

या बळावरच लढवय्या सैनिक अशी त्यांची ओळख राहिली. नगरपालिकेची निवडणूक जिंकून त्यांनी नगरसेवक म्हणून पाच वर्षे काम केले. सलग दुसऱ्यांदा ते नगरपालिकेत निवडून आले. शिवसेना नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. नगराध्यक्षपदाच्या काळात शहर विकासाची अनेक कामे मार्गी लावली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. शिवसेनाप्रणीत जयभवानी पुस्तक पेढीची स्थापना त्यांनी केली. या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबविले. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप हा उपक्रम पेढीने सुरू केला. जवळपास २० वर्षे हा उपक्रम सुरू राहिला. छाजेड यांच्या निधनाने अनेक शिवसैनिकांना आपल्या भावना अनावर झाल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 1:39 am

Web Title: manmad rajabhau chhajed commit suicide
Next Stories
1 त्याने पाहिले अन् इतरांना वाचविले!
2 सरकारी यंत्रणांची विश्वासार्हताही पाण्यात!
3 भुजबळ समर्थक कैलास मुदलियारला कोठडी
Just Now!
X