नाशिकसह मराठवाडा, नगर, उत्तर महाराष्ट्रात संप सुरूच ठेवणार

शुक्रवारी मध्यरात्री मुंबईत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी संपाला वेगळेच वळण लागले असून किसान क्रांतीच्या समन्वयकांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. संपाचे केंद्र असणाऱ्या पुणतांबा येथे संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर तह करणारे संयोजक फितूर निघाल्याचा ठपका ठेवला. संप मागे घेण्याच्या घोषणेचे प्रतिकूल पडसाद उमटू लागल्याने संयोजकही अंतर्धान पावले आहेत. मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणाऱ्यांपैकी एक असलेले जयाजी सूर्यवंशी यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये निदर्शने करण्यात आली. नाशिकमध्ये संप मागे घेण्याचा निर्णय धुडकावण्यात आला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि नगरमध्ये शेतकऱ्यांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत संघर्षांचा पवित्रा कायम ठेवला असून यासंदर्भात रविवारी पुणतांबा व नाशिक येथे तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढील दोन दिवसात संपात सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. नाशिक बाजार समितीत शनिवारी पालकमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला तोंड द्यावे लागले. त्यांना बोलू न देता शेतकऱ्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी करत पिटाळून लावले.

किसान क्रांतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाल्यानंतर संप मागे घेण्याचे जाहीर केल्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. गटबाजीची झळ संपाच्या फुटीला कारणीभूत ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पुणतांबा हे राज्यातील शेतकरी संपाचे मुख्य केंद्रबिंदू होते. संयोजकांपैकी जयाजी सूर्यवंशी व संदीप गिड्डे यांनी मुख्यमंत्री चर्चेला तयार असल्याचे सांगत चर्चेसाठी इतरांना राजी केले. पण, रोखठोक भूमिका घेणाऱ्यांना दूर ठेवले. धनंजय जाधव हे पुणतांबा गावातील एकमेव प्रतिनिधी उपस्थित होते. संप मागे घेतल्याचे समजल्यानंतर पुणतांबा ग्रामपंचायतीसमोर शेतकरी मोठय़ा संख्येने जमा झाले. त्यांनी संयोजकांचा निषेध करीत विश्वासघातकी, फितुर, गद्दार, लाचखोर अशा शेलक्या शब्दात त्यांच्यावर हल्लाबोल केला. शेतकरी संतप्त असताना संयोजक गायब आहेत. जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी संप सुरू ठेवण्याचा निर्धार केला. या संदर्भात रविवारी सकाळी ११ वाजता पुणतांबा येथे बैठक होणार आहे.

नाशिकमध्येही निर्णयाविरोधात दिंडोरी रस्त्यावर शेतकरी महिलांनी रस्त्यावर उतरून वाहने रोखली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात शहरात जाणारे दूध आसपासच्या भागात वितरित करण्यात आले. सकाळी नऊ वाजेपासून नाशिक बाजार समितीत शेतकरी जमण्यास सुरूवात झाली. यावेळी दुकान उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांशी त्यांचे वाद झाले. त्यांचा भाजीपाला फेकण्यात आला. लेखी स्वरुपात ठोस आश्वासन मिळाले नसताना संप मागे घेण्याच्या कृतीवर ताशेरे ओढण्यात आले. संप मागे घ्यायचा की नाही, याबद्दल सर्वसहमतीने निर्णय होणार होता. परंतु, कोणाशी चर्चा न करता सर्वाना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला गेल्याचे जिल्हा समन्वयक तथा राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. कर्जमाफी, शेतमालास हमीभाव यासह इतर मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत नाशिकमध्ये संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.