निवडणूक आयोगाने मतदान यंत्रावर उमेदवाराचे छायाचित्र छापण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला, तरी मतदान यंत्रावरील उमेदवाराचे चिन्ह हटवले तरच भारतीय राज्य घटनेला अभिप्रेत असणारी निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. मतदान प्रक्रियेतील उमेदवाराचे निवडणूक चिन्ह हटवावे या मागणीबरोबरच निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हाव्यात यासाठी आपण जनजागृती करणार आहोत. प्रसंगी नजीकच्या काळात निवडणूक सुधारणांसाठी आंदोलन करणार असल्याचे हजारे म्हणाले.

निवडणूक प्रक्रियेत सुधारणा कराव्यात, उमेदवाराचे चिन्ह हटवून त्या ऐवजी उमेदवाराचे छायाचित्र छापावे, मतदारांना उमेदवार नाकारण्याचा पर्याय (नोटा) मतदान यंत्रावर असावा, गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढण्यास बंदी करावी, या मागण्यांसाठी हजारे गेल्या काही वर्षांपासून निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करीत आहेत.

उमेदवार नाकारण्याचा पर्याय देण्याची मागणी यापूर्वी मान्य झाली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या मतदान यंत्रावर उमेदवाराचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात हजारे बोलत होते.