मुंबई विद्यापीठाने कोकाकोला या कंपनीशी टायअप करून श्री पंचम खेमराज महाविद्यालयाला मार्केटिंग डेव्हलपमेंट असोसिएट डिग्री कोर्स सुरू करण्याची संधी दिली आहे. त्या कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाने महाविद्यालयात भेट देऊन पायाभूत सुविधांची पाहणी नुकतीच केली.
या वेळी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे केंद्रप्रमुख प्रा. एम. ए. ठाकूर यांनी कोकाकोला कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाने पाहणी केल्याच्या वृत्तान्ताची माहिती पत्रकारांना दिली. या वेळी संस्था सचिव प्रा. एम. डी. देसाई व उपाध्यक्ष पी. एफ. डॉन्टस उपस्थित होते. मुंबई विद्यापीठातील चारशे महाविद्यालयांपैकी चार महाविद्यालयांना कोकाकोला कंपनीसाठी आवश्यकता लागणाऱ्या स्टाफच्या शिक्षण अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. त्यात श्री पंचम खेमराज महाविद्यालय एक भाग्यवान महाविद्यालय आहे, असे सचिव प्रा. एम. डी. देसाई म्हणाले. या महाविद्यालयास कोकाकोला कंपनीचे सोम्यवटी, केदारवाशी व गोवा रीजनचे प्रसाद शिवलकर यांनी भेट देऊन पाहणी केली. कोकाकोला इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅकडमीमार्फत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देताना मार्केटिंग डेव्हलपमेंट असोसिएट डिग्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन वर्षांत मार्केटिंग डेव्हलपमेंटमधून विद्यार्थ्यांना थेट कंपनीत नोकरी मिळेल, असे प्रा. एम. डी. देसाई म्हणाले. श्री पंचम खेमराज महाविद्यालयात विद्यार्थिनींचा ५१ टक्क्यांपेक्षा जास्त सहभाग असून महात्मा गांधी अभ्यास केंद्रही असल्याची कंपनीच्या मान्यवरांनी नोंद घेतली आहे. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यावर कोकाकोला कंपनीचे प्रशिक्षक दर आठवडय़ाला येतील व दर सहा महिन्यांनी परीक्षाही होईल, असे प्रा. एम. ए. ठाकूर यांनी बोलताना सांगितले. कोकाकोला मार्केट डेव्हलमेंट असोसिएट कोर्सला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे प्रा. ठाकूर म्हणाले.