जादा दराने झेरॉक्स यंत्रे खरेदी करण्याचा समाजकल्याण समिती सभापतींचा प्रयत्न जिल्हा परिषद सदस्यांनी आज, शनिवारी स्थायी समितीच्या सभेत हाणून पाडला. तब्बल ४७ लाख रुपयांची झेरॉक्स यंत्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव सभेपुढे सादर करण्यात आला होता. त्यासाठी एका वितरकाला ७३५ रुपयांचा अधिक दर मंजूर करण्यात आला होता. या विषयावरून स्थायी समितीच्या सभेत मोठी गरमागरम चर्चा झाली.
अखेर याबाबतचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्यावर सोपवण्यात आला. गुंड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेनंतर अध्यक्षांनी सभेतील निर्णयाची माहिती दिली, मात्र झेरॉक्स यंत्रावरील चर्चेचा विषय त्यातून वगळला. मात्र काही सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका वितरकाला तब्बल ७३५ रुपयांचा अधिक दर देऊन झेरॉक्स यंत्रे खरेदीचा प्रस्ताव समाजकल्याण समितीने ठेवला होता.
झेरॉक्स यंत्रे खरेदीचा प्रस्ताव गेल्या वर्षीपासून समितीकडे भिजत पडलेला आहे. ही रक्कम अखर्चित राहिल्याने त्याचे पुनर्वियोजन करण्यात आले, त्यालाही दिरंगाई झालेली आहे. समितीने दरकरारावरील एका वितरकाकडून झेरॉक्स यंत्रे खरेदी करण्याचा प्रस्ताव मान्य केला. मात्र स्थायी समितीच्या सभेत ज्येष्ठ सदस्य विठ्ठलराव लंघे, बाळासाहेब हराळ, कैलास वाकचौरे, सुजित झावरे, सत्यजित तांबे आदींनी त्याच कंपनीची यंत्रे आणखी एक दरकरारावरील वितरक ७३५ रुपयांनी कमी दराने उपलब्ध करण्यास तयार असल्याकडे लक्ष वेधले. मात्र खरेदीत दिरंगाई होऊन निधी अखर्चित राहील अशी भूमिका घेत समितीचा प्रस्ताव मंजूर करण्याचा आग्रह स्थायी समितीच्या सभेत केला जात होता. जि.प.ची यामध्ये किमान १ लाख रुपयांची बचत होऊन आणखी तीन यंत्रे लाभार्थीना उपलब्ध होतील, याकडे हराळ, झावरे यांनी लक्ष वेधले.
 ‘स्नेहभोजन’ अखेर बारगळले!
शिक्षण व आरोग्य समितीची सभा परमीट रूम व बीअर बार असलेल्या हॉटेलमध्ये झाली, यावरून स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ समितीची नाहीतर संस्थेचीच ही बदनामी असल्याची भावना काही सदस्यांनी व्यक्त केली. याविषयावर शेरेबाजी करून सदस्यांनी सभेत उपाध्यक्ष अण्णा शेलार यांना हैराण केले. दरम्यान, विधानपरिषदेच्या नगरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातील जागेसाठी इच्छुक उमेदवाराने स्थायी समिती व त्यानंतर झालेल्या जलसंधारण समितीनंतरही मतदार असलेल्या सदस्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केले होते, त्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर हे स्नेहभोजन सदस्यांनी रद्द करण्यास भाग पाडले.