रायगड जिल्ह्यातील एकाही आमदाराकडून प्रस्तावच नाही
केंद्राच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यातही आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र या महत्त्त्वाकांक्षी योजनेबाबत आमदारच उदासीन असल्याचे दिसून आहे. रायगड जिल्ह्यातील १० आमदारांपकी एकानेही आदर्श ग्राम योजनेसाठी गावाची निवड केलेली नाही. त्यामुळे योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश २० मे २०१५ प्रसिद्ध करण्यात आला. प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील तीन गावांची निवड करून ती नावे राज्य सरकारकडे पाठवणे आवश्यक होते. यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र रायगड जिल्ह्यातील विधानसभेच्या सात व विधान परिषदेच्या तीन अशा एकूण १० आमदारांपकी एकानेही या योजनेसाठी आपल्या मतदारसंघातील गावांची नावे अद्याप कळवलेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व आमदार या योजनेबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. योजनेसाठी निवडण्यात आलेली गावे जुल २०१९पर्यंत आदर्श ग्राम म्हणून विकसित केली जाणार आहेत. मात्र या गावांची निवड करताना आमदारांना आपले स्वत:चे व आपल्या पत्नीच्या माहेरचे गाव या योजनेसाठी निवडण्यास र्निबध घालण्यात आले आहेत. याशिवाय निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या किमान एक हजार असणे अपेक्षित आहे. मुंबईसारख्या शहरी भागातील आमदारांना शेजारच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांची निवड करता येणारा आहे. तर विधान परिषदेचे सदस्य त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यातून गावांची निवड करू शकणार आहेत.
रायगड जिल्ह्यात एकूण १० आमदार आहेत. यात भरत गोगावले (महाड), अवधूत तटकरे (श्रीवर्धन), सुभाष पाटील (अलिबाग), धर्यशील पाटील (पेण), मनोहर भोईर (उरण), प्रशांत ठाकूर (पनवेल), सुरेश लाड (कर्जत) या सात विधानसभा सदस्यांचा तर सुनील तटकरे, अनिल तटकरे व जयंत पाटील या विधान परिषद सदस्यांचा समावेष आहे. यापकी एकानेही या आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी गावांची निवड केलेली नाही. त्यामुळे योजना सुरू होण्यापूर्वीच तिचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान याबाबत विचारणा केली असता मतदारसंघातील एका गावाची निवड केल्यास दुसऱ्या गावातील लोक नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावांची निवड करताना अडचणी येत आहे. मात्र आता आपण अलिबाग तालुक्यातील धोकावडे गावाची ‘आमदार आदर्श गाव’ म्हणून निवड करत असल्याचे शेकाप आमदार सुभाष पाटील यांनी सांगीतले. तर आपल्या मतदारसंघात पाच तालुके येतात अशा परिस्थितीत एका गावाची निवड करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे राज्य सरकारने किमान प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार अवधूत तटकरे यांनी केली.