मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रातून लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे यांनी ट्विटरवर नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारे व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरेंनी मोदींच्या विधानाचा दाखला दिला. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. काँग्रेसने मला छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.

काय म्हणाले होते मोदी?
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. देशाची २००४ ते २०१४ ही मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील वर्षे वाया गेली आणि भ्रष्टाचार करता यावा म्हणून अनेकांना अशक्त सरकार हवे असते, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. मोदींनी भाषणात गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना काँग्रेसने केलेल्या आरोपांचा दाखलाही दिला होता. गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर वाटेल ते आरोप करुन माझा छळ करण्यात आला. २००७ पासून काँग्रेस मला तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहे. त्यांनी अमित शाह यांना तुरुंगातही टाकले. पण आम्ही कधीही गुजरातमध्ये सीबीआयला प्रवेशबंदी केली नाही. माझी तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली होती, असे मोदींनी सांगितले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray jibe at pm narendra modi in cartoon why modi harass people
First published on: 19-01-2019 at 10:19 IST