महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे १० दिवसांच्या पश्चिम विदर्भ दौ-यासाठी रवाना झाले आहेत. आज सायंकाळी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अमरावती एक्सप्रेसने रवाना झाले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरी भागांसोबतच ग्रामीण महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष केंद्रित केले असून पक्षविस्तार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणे हे त्यांच्या दौऱ्यामागील मूळ उद्देश असल्याचे समजते. मनसेच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे. या दौ-याला मिळणा-या प्रतिसादाकडे विविध राजकीय पक्षाचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी राज यांच्या स्वागतासाठी पोस्टर लावण्यात आले आहेत.

राज यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान इतर पक्षातील नेत्यांचे तसेच पदाधिकाऱ्यांचे प्रवेश अपेक्षित आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून नवीन नियुक्त्या करून पक्ष बांधणी करणे आणि पक्षाला स्थानिक स्तरावर उभारी देण्यावर राज ठाकरेंचा विशेष असणार आहे. राज ठाकरे यांच्या या दौ-यामध्ये त्यांच्यासोबत इतर पदाधिकारी देखील सर्व बैठकांना हजर असणार आहेत. १७ आॅक्टोबरपासून अमरावती येथून राज यांच्या दौ-याला सुरूवात होणार  आहे. येथे ते  ‘अंबामहोत्सव’ला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २२ आॅक्टोबरला वणी, यवतमाळ, २३ आॅक्टोबरला यवतमाळ, वाशिम, अकोला, शेगाव, २४ आॅक्टोबरला बुलढाणा तर २६ आॅक्टोबरला राजमाता जिजाऊ जन्मस्थळास ते भेट देणार आहेत.