News Flash

मराठी माणसावर हात उचलला म्हणून मनसेने गुजराती व्यक्तीला शिकवला धडा

"महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मान ठेवलाच पाहिजे"

ठाण्यातील नौपाडा येथे एका सोसायटीतील दोन सदस्यांमध्ये झालेल्या वादामुळे मराठी विरुद्ध गुजराती असं चित्र निर्माण झाल्याचं दिसत आहे. राहुल पैठणकर आणि हसमुख शहा अशी यांची नावे असून याप्रकरणी दोघांनीही एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांनीही एकमेकांना शिविगाळ केली असून मारहाण केली असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान आता या वादात मनसेने उडी घेतली असून मराठी माणसावर हात उचलल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

राहुल पैठणकर आणि हसमुख शहा यांच्यामधील मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर मराठी विरुद्ध गुजराती अशी चर्चा रंगली होती. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या व्हिडीओची दखल घेत हसमुख शहा यांना भेटेल तिथे मारल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत हसमुख शहा यांना कान पकडून माफी मागण्यास भाग पाडलं आहे.

व्हिडीओत अविनाश जाधव आपण हसमुख शहा यांना अद्दल घडवणार असल्याचं सांगत आहे. “महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मान ठेवलाच पाहिजे,” असंही ते ठणकावून सांगत आहेत. तसंच “राज ठाकरेंनी मला कॅमेऱ्यासमोर शिवी देऊ नको आणि मारहाण करु नको असा आदेश दिला आहे. कॅमेरा बंद झाल्यानंतर जे काही करायचं आहे ते मी करणार आहे,” असंही यावेळी ते सांगत आहे.

व्हिडीओत हसमुख शहा माफी मागताना दिसत असून मराठी माणसाचं मन दुखावलं असेल तर कान पकडून माफी मागतो असं बोलत आहेत.

काय आहे प्रकरण ?
हसमुख शहा आणि राहुल पैठणकर सुयश अपार्टमेंटमध्ये राहतात. ११ सप्टेंबर रोजी लिफ्टच्या वादातून हसमुख शहा आणि राहुल पैठणकर यांच्यात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 7:04 pm

Web Title: mns raj thackeray thane avinash jadhav hasmukh shah marathi sgy 87
Next Stories
1 काश्मिरी जनतेवरील अन्याय दूर!
2 लोकलमध्ये प्रसुती
3 मनसेकडून डोंबिवलीत आंदोलनातून युतीची खिल्ली
Just Now!
X