रत्नागिरी : मध्यरात्री महिलेचा विनयभंग करणार्या आरोपीला न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर अवघ्या ४८ तासात निकाल देत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणी संबंधित पीडित महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तत्परतेने  तपास करत काही तासांत गुन्ह्याचा छडा लावला आणि  गणेश अनंत घवाळी  (वय २९ वर्षे, रा. घवाळीवाडी, ओरी) या संशयित व्यक्तीला अटक केली. त्याने गुन्हा कबूल केल्याने १३ दिवसांत दोषारोपपत्र सादर करण्यात आले.  त्यावर न्यायालयाने सोमवारी  हा निकाल दिला.

गेल्या ११ सप्टेंबरला मध्यरात्रीच्या  सुमारास पीडित महिला कुटुंबाती अन्य सदस्यांसह हॉलमध्ये झोपली होती. त्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपीने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी सबंधित महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी घवाळी याच्याविरुध्द गेल्या  शनिवारी ( २२ सप्टेंबर )  गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी हा मुंबईला गेलेला होता.

ग्रामीण पोलिस त्याच्या मागावर होते. गेल्या रविवारी  (ता. २३) त्याला अटक करण्यात आली. या घटनेचा तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संपदा बेर्डे यांनी केला.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एम. सरडे यांच्या न्यायालयात खरोखर जलदगतीने चाललेल्या या खटल्यामध्ये न्यायालयाने आरोपीला एक वर्षांचा सश्रम कारावास व तीनशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.  गुन्हा शाबित करण्याची मोलाची कामगिरी पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व अन्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली.

सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मुजावर यांनी काम पाहिले.