आई व शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिले विद्यापीठ असून हे दोन्ही घटक समानार्थी आहेत. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास घडविण्यास या हृदयीचे त्या हृदयी करणारा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ अनिरुद्ध देशपांडे यांनी केले.
मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात शिक्षक उद्बोधनवर्ग तथा प्रशिक्षण कार्यशाळेत बीजभाषण देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मुरलीधर इन्नानी होते. सत्यनारायण कर्वा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिक्षकांनी अध्यापन क्षमतेने, ममतेने व योग्यतेने ध्येय ठरवून स्वयंप्रेरणेने करावे, असे कर्वा यांनी सांगितले. कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व व त्यांची समाज, पालक, विद्यार्थी यांच्यासमवेत आंतरक्रिया या विषयावर डॉ. अशोक कुकडे यांनी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिक्षकांशी सुसंवाद साधला.
अंबाजोगाई येथील प्रसाद चिक्षे यांनी ज्ञानदान व ज्ञानार्जनाची सवय, विद्यार्थी समुपदेशन, शिक्षकांचे स्वयंमूल्यमापन या संदर्भात आपल्या अनुभव कथनातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अमृतमहोत्सव समितीचे संयोजक लक्ष्मीरमण लाहोटी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व स्मृतिग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. सूर्यप्रकाश धूत, बालकिशन बांगड, माचिले, श्रीकिशन अग्रवाल, अनिल राठी, लक्ष्मीकांत कर्वा, कमलकिशोर अग्रवाल, आनंद लाहोटी आदी उपस्थित होते.
प्रवीण खरोसेकर यांनी सूत्रसंचालन केले. श्यामसुंदर भार्गव यांनी आभार मानले. संस्थेच्या विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.