दीक्षांत समारंभात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व्ही.एन. मोरे यांची खंत

एकीकडे शिक्षणाचा विस्तार होत असताना शैक्षणिक दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होणे हे परिस्थितीचे गांभीर्य दर्शवणारे आहे. चतूर्थश्रेणी कर्मचाऱ्यास मिळणाऱ्या वेतनापेक्षाही कमी वेतनात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकवण्याचे काम काही पदवीधर करतात, पण नियमित शिक्षकांना, प्राध्यापकांना चांगले वेतनमान मिळून सुद्धा अध्यापनाकडे का दुर्लक्ष होत आहे, असा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व्ही.एन. मोरे यांनी येथे उपस्थित केला.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत सभामंडपात झालेल्या ३४ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठातील सुमारे ३६ हजार ७२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.  गुणवंत विद्यार्थ्यांना १०५ सुवर्णपदके आणि विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. ४३९ संशोधकांना आचार्य (पीएच.डी)पदवी तर डॉ. संतोष ठाकरे यांना डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. या समारभांत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर आदी  उपस्थित होते.

व्ही.एन. मोरे म्हणाले की, शिक्षणाच्या दर्जाबाबत एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष काळजीत टाकणारे आहेत. चौथीतील विद्यार्थ्यांना अपेक्षित असणारी वाचन, लेखन, आकलन किंवा गणिती कौशल्ये आठवीतील विद्यार्थ्यांनाही बहुतांशेने प्राप्त झालेली नाहीत. लोकसेवा आयोगात मुलाखत देणाऱ्या काही उमेदवारांकडे व्यवहारज्ञानाचा पूर्ण अभाव दिसून येतो. अनेक पदवीधरांच्या आकलन क्षमतेविषयी संशय येतो, हे क्लेषदायक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाची दारे सर्वासाठी खुली व्हावीत, म्हणून चार दशकांपूर्वी विनाअनुदानित तत्व अंमलात आले. अनेक महाविद्यालये उघडली. पण, अत्यंत कमी पगारावर या ठिकाणी अनेक पदवीधर अध्यापनाचे काम करतात.  हे पाहिल्यावर त्यांना दोष तरी कसा द्यावा, असा प्रश्न पडतो.  पण    नियमित शिक्षकांचे, प्राध्यापकांचे वेतनमान सुद्धा खरोखरच अध्यापनाकडे दुर्लक्ष करण्याएवढे कमी आहे का, याचाही विचार आवश्यक वाटतो.

राज्याच्या एकूण खर्चापैकी सुमारे २० टक्के खर्च शिक्षणावर होतो, हेही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

व्ही.एन. मोरे यांनी संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची महती सांगतांना निसर्गातील साधनसंपत्तीच्या मर्यादित वापराविषयी, भौतिक बाबींचा मोह आणि अतिरेक टाळण्याचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. मोबाईल, इंटरनेटचा गैरवापर अधोगतीकडे नेऊ शकतो, या साधनांच्या हातचे बाहुले बनू नका, असा सल्ला दिला. ज्ञानार्जन हे आता ग्रामीण भागात आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहे. कष्ट करणाऱ्यांसाठी अगणित संधी प्राप्त झाल्या आहेत.

फक्त उपलब्ध तंत्रज्ञानाचा व ज्ञानचा कसा व किती वापर करावयाचा, हे ज्याचे त्याने सूज्ञपणे व तारतम्याने ठरवायचे आहे, असे व्ही.एन. मोरे म्हणाले.

यावेळी प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर म्हणाले, विद्यापीठ कुशल मनूष्यबळ निर्मितीसाठी कटीबद्ध आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी विद्यापीठ नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांवर आणि कौशल्य विकासाच्या उपक्रमांवर भर देत आहे. विद्यापीठात महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा ४ हजार ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी १ हजार विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेंट’ झाले होते. शैक्षणिक प्रगतीसोबतच संशोधनाच्या क्षेत्रातही विद्यापीठाची आगेकूच सुरू आहे.