पालघर एसटी आगाराच्या महसुलाचा ११ कोटी ९५ लाख १५ हजारांचा पल्ला

पालघर : करोनाकाळात पालघरच्या एसटी विभागाला तोटा झाल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न केला. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या आंतरराज्य, आंतरजिल्हा एसटी फेरीच्या माध्यमातून पालघर विभागाची उत्पन्नात दहा पटीने वाढ झाली आहे.   विभागाने ११ कोटी ९५ लाख १५ हजाराच्या उत्पन्नाचा पल्ला गाठला आहे.

राज्य परिवहन विभागाच्या राज्यातील ३० विभागांतर्गत पालघर विभागाने प्रवाशांना सेवा देत त्यातून चांगले उत्पन्न मिळवले आहे. सद्य:स्थितीत एसटी विभागामार्फत सुरू असलेल्या एसटी बस फेरीतून प्रति  ३३.६९ किमी इतके विक्रमी उत्पन्न मिळवीत आहे.  उत्पन्नवाढीसाठी एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे पालघर विभागाने ही  मजल मारली आहे. प्रवासी वाहतुकीबरोबर मालवाहतूक सेवेतून एसटीला उत्पन्न मिळावे असे प्रयत्न सुरू झाल्याने त्याला चांगला प्रतिसाद लाभला. पालघर विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण आठ आगार आहेत. सध्या येथून दररोज एसटी बसच्या तीन हजार ३७४ फेऱ्यासह १ लाख ४३ हजार किलोमीटर्सचा प्रवास केला जात आहे. एसटीचे चालक आणि वाहकांनी एसटी विभागाला सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. विभागाच्या ८ आगारातून नोव्हेंबर च्या सुरुवाती पासून दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद, शिरपूर, भुसावळ, पैठण, नंदुरबार, स्वारगेट, शिर्डी, नगर, जामखेड, धुळे, पाथर्डी, चाळीसगाव, म्हसवड, लातूर, रत्नागिरी, आंबेजोगाई, कोल्हापूर, चोपडा, विटा, पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर, भूम, नाशिक, कळवण, गोंदवले, सांगली, पाळनेर,वाशीम, गेवराई, आदी भागात जाणाऱ्या शिवशाही, निमआराम, शयनयान आदी एसटी फेऱ्यांना प्रवाशांनी ९३ टक्केच भारमान देत उत्तम प्रतिसाद दिला.

मिळालेले उत्पन्न

एप्रिलमध्ये १ कोटी ५४ हजारांचे असलेले उत्पन्न मे महिन्यात ३ कोटी १२ हजार,जून- २ कोटी २५ लाख ९७ हजार,जुलै  ४ कोटी २१ लाख ७१ हजार,ऑगस्ट   ४ कोटी ८२ लाख ७हजार,सप्टेंबर – ६ कोटी ६५ लाख ५३ हजार,ऑक्टोबर -९ कोटी १८लाख ३६ हजार तर नोव्हेंबर मध्ये ११ कोटी ९५लाख १५ हजार इतके जवळपास १० पटीने उत्पन्न वाढले आहे.एप्रिल महिन्यात १६ रुपये, ११ रुपये असणारे उत्पन्न सात महिन्यांत दुप्पटीने वाढवून ते ३३ रुपये ते ६९ रुपयांपर्यंत नेण्यात पालघर विभागाने यश मिळविले आहे.

कोरोना काळात कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला.  स्वच्छतेबरोबरच प्रवाश्यांची काळजी घेतली. दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांनी विश्वास टाकल्याने कर्मचाऱ्यांच्या  सहकार्याने  उत्पन्नात भरारी घेऊ शकलो.

राजेंद्र जगताप, विभागीय व्यवस्थापक,पालघर विभाग.

पालघर विभागांतर्गत सेवा

(प्रतिदिन)

आगार        फेऱ्या        प्रवास (किमी.)

पालघर         ६९२        २१,१३८

सफाळे         ४२७        ७, ६७६

वसई            ३५८        २०, १४५

अर्नाळा        २९८        २२, ६५५

डहाणू           ४४५        १६, ०४०

जव्हार          ४५७       १९,६३६

बोईसर        ५५५         २२,०३८

नालासोपारा  १४६       १३,८८७