जगात अणू ऊर्जा प्रकल्पाला विरोध होत असल्याने भारताने अणू ऊर्जा प्रकल्पांना विरोध करावा, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेनेचा अणू ऊर्जा प्रकल्पाला विरोध नाही, परंतु सुरक्षिततेच्या कारणास्तव जैतापूर प्रकल्पाला विरोध आहे, तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय वित्तीय संस्थांकडून निधी उभारणार असून हा प्रकल्प डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होईल. या मार्गावर टोल उभारले जातील, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री अनंत गीते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांचे स्वागतही करण्यात आले. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते झाराप या महामार्गाचे चौपदरीकरण एकाच वेळी करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी संकल्प सोडला आहे. खरे तर या चौपदरीकरणाचे नियोजन काँग्रेस सरकारचे होते पण त्याची अंमलबजावणी आता होत आहे. त्या वेळी मनमोहन सिंग सरकारने बीओटी तत्त्वावर रस्त्याचे काम करण्याचे ठरविले होते पण खासदार म्हणून त्या वेळी विरोध केला, असे अनंत गीते म्हणाले.
सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार नाही याची दखल घेत खासगी वित्तीय संस्थांकडून निधी उभारून कोकणातील इंदापूर ते झाराप हा महामार्ग पाच टप्प्यांत पूर्ण करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठरविले आहे. शिवसेनेची मागणी ज्या अर्थाने गडकरी यांनी मान्य करून कोकणातील चौपदरीकरणाला मान्यता दिली आहे. या सर्वाधिक अपघात होणाऱ्या मार्गाचे सप्टेंबपर्यंत भूसंपादन, ऑक्टोबरमध्ये निविदा आणि त्यानंतर एकाच वेळी पाचपेक्षा अधिक टप्प्यात काम करून डिसेंबर २०१७ पर्यंत चौपदरीकरण पूर्ण होईल, असे अनंत गीते म्हणाले.
या रस्त्यावर कमीत कमी विस्थापन, शंभर टक्के पुनर्वसन व दुप्पट नुकसानभरपाई दिली जाईल. या रस्त्याचे पाचऐवजी दहा टप्प्यांत काम झाल्यास ठेकेदारही उपलब्ध होतील. एक टप्पा ४०० कोटींचा असेल. त्या क्षमतेचे ठेकेदार मिळणे अवघड असल्याने दहा टप्प्यांत काम व्हावे ते जलद होईल, असे अनंत गीते म्हणाले.
या मार्गावर १४ मोठय़ा पुलांचे काम सुरू झाले असून प्रत्यक्षात सहा पुलांचे काम सुरू झाले आहे, असे अनंत गीते म्हणाले. वित्तीय संस्थांकडून निधी उभारला जाणार असल्याने टोल उभारले जातील, असे खुद्द केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे, असे गीते म्हणाले. त्यामुळे टोल बसविला जाईल.
शिवसेनेचा अणू ऊर्जा प्रकल्पाला विरोध नाही पण जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला विरोध असण्याची तीन कारणे आहेत. त्यात स्थानिक जनतेचा विरोध, जपान, नेपाळमध्ये भूकंप झाले, त्यानंतर अणू ऊर्जा प्रकल्पाला जगाने विरोध केला. जैतापूरही भूकंपप्रवण क्षेत्र आहे. जगात अणू ऊर्जा प्रकल्पांना विरोध होत असताना भारताने अणू प्रकल्पांना पाचारण करावे याला शिवसेनेचा विरोध आहे. सुरक्षितता, दहशतवादी धोका या तांत्रिक मुद्दय़ावर शिवसेनेने पंतप्रधानांकडे जैतापूरला विरोध केल्याचे अनंत गीते यांनी सांगितले.
अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने किंवा खासगी तत्त्वावर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गात उद्योग प्रकल्प आणण्याचा विचार आहे. अखंड कोकणात तिन्ही जिल्ह्य़ांत रेल्वेवर आधारित उद्योग प्रकल्प, स्टील प्रकल्प, ऑटोमॅटिक इंडस्ट्रीज उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे. शासकीय किंवा खासगी प्रकल्प असतील, मात्र कोकणात एक एक प्रकल्प यावा असे अनंत गीते म्हणाले.
रेल्वेसंबंधित उद्योग कोकणात आणणार
रेडीत टाटा मेटालिकच्या जागी रेल्वेवर आधारित उद्योग आणण्याचा विचार करू, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी म्हटले आहे. टाटा मेटालिक कर्मचारी संघटनेचे नितीन सावंत, प्रसाद सौदागर व गफार खानापुरे यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते यांना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत भेटून निवेदन दिले. त्या वेळी हे आश्वासन दिले. रेडीतील टाटा मेटालिक कंपनी बंद झाल्याने दोन हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामगारांवर परिणाम झाला आहे. या ठिकाणी १२५ एकर जमीन आहे. तेथे प्रकल्प सुरू करावा, असे निवेदन दिले. या वेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते म्हणाले, माझ्याकडे असणाऱ्या खाते किंवा व्यतिरिक्त शासन, खासगी कंपनीचा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न राहील. रेल्वेशी संबंधित उद्योग या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही गीते यांनी दिली.