मुंबई आणि उपनगरात सततच्या पावसाने दोन दिवसापासून थैमान घातले आहे. काल सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने अद्यापही विश्राम घेतलेला नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा ठप्प आहेत. तर पश्चिम मार्गावरील रेल्वेसेवादेखील ठराविक अंतरापर्यंत चालवण्यात येत आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यादेखील उशिराने धावत असून काही रेल्वे विविध स्थानकांमध्ये थांबवण्यात आल्या आहेत.

मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी मुळात मुंबई स्थानकातून दोन तास उशीरा निघाली. पावणे दोन वाजता ती गाडी कल्याण- डोंबिवली पर्यंतच पोहोचली होती. झोपलेल्या प्रवाशांना जेव्हा पहाटे जाग आली, तेव्हा ५ वाजता गाडी केवळ इगतपुरी येथे च पोहोचल्याचे समजले. हे समजल्यावर प्रवाशांमधील अस्वस्थता वाढू लागली. या गाडीचा मार्ग रात्री अचानक बदलला. मनमाड, दौंड, पुणे या मार्गाने ही गाडी चालविण्यात येत आहे. ही गाडी मनमाडला सकाळी ८ वा. पोहोचली. ९ वाजता ती पुढे रवाना झाली असली, तरी अत्यंत संथपणे ही गाडी पुढे चालत आहे. गाडीची ही गती पाहता ती गाडी कराड, सांगली, मिरज व कोल्हापुरात कधी पोहचणार याची काळजी प्रवाशांना लागली आहे.

दरम्यान, कोल्हापूर मध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस चार वाजता म्हणजे ८ तासाहून अधिक विलंबाने गाडी येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तर, तिरुपूर येथून येणारी हरिप्रिया एक्सप्रेस आज कोल्हापुरात येणार नाही. मिरज येथेच ती थांबवली जाणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.