भारतीय रेल्वेकडून नुकतीच पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या प्रगती एक्सप्रेस या सुपरफास्ट रेल्वेत सुधारणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट योजनेंतर्गत देशातील ६४० रेल्वेंमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यातच प्रगती एक्सप्रेसचा नंबल लागला असून त्याची सुधारणा करण्यात आली आहे. मुंबई-पुणे मार्गावर दररोज धावणारी ही गाडी अद्यायावत असावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गाडीत सुधारणा करण्यात आल्या असल्या तरीही प्रवाशांना मात्र त्या रुचलेल्या नाहीत. अनेक प्रवाशांनी गाडीबाबत काही तक्रारी केल्या असून स्वच्छतागृहांची दारे योग्य नाहीत. या दारांच्या धारधारपणामुळे प्रवाशांना ते लागण्याची शक्यता आहे. अनेक फॅन चालू नाहीत. या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला अशाप्रकारे रेल्वे अपग्रेड करु नका अशी विनंती केली आहे.

आम्हाला नवीन रेल्वे देणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्याऐवजी प्रशासनाने आहे त्याच गाडीला रंग देऊन, वॉलपेपर लावून कामचलाऊपणा केला आहे. रेल्वे वेगात असताना स्वच्छतागृहातील टाईल्स आणि खिडकीचे ग्रिल प्रवाशांच्या डोक्यात पडेल की काय अशी आम्हाला भिती वाटते असेही नियमित प्रवास करणाऱ्या वकील महिनेने मिड-डे शी बोलताना सांगितले. रेल्वेच्या स्वच्छतागृहामध्ये टाईल्स कोण लावतं असा प्रश्न विचारत या टाईल्सच्या मध्ये लावण्यात आलेले व्हाईट सिमेंट अनेक ठिकाणी पडले असल्याचेही प्रवाशाने सांगितले. ही सुपरफास्ट ट्रेन असून ती दर २५ किलोमीटरवर थांबते मात्र या रेल्वेची अवस्था अतिशय वाईट आहे. याठिकाणी असणाऱ्या सिंकमधील पाण्याचा घाण वास संपूर्ण कोचमध्ये पसरतो आणि तो अतिशय त्रासदायक ठरतो असे कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर गंगावणे म्हणाले.

गाडीतील कोच बसण्यासाठी योग्य नसल्याने नियमित प्रवास केल्याने पाठदुखीचा त्रास उद्भवू शकतो असेही काही प्रवाशांनी सांगितले. याबाबत मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी म्हणाले, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या रेल्वेची तपासणी करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये या तक्रारी दिसून आल्या नाहीत. पण प्रवाशांच्या तक्रारी असतील तर त्याची योग्य ती दखल घेऊन सुधारणा करण्यात येतील. आम्ही प्रवाशांकडून येणाऱ्या प्रतिक्रीया आणि सूचना यांचे कायम स्वागत आहे असेही ते म्हणाले. देशातील ठराविक रेल्वेंमध्ये सुधारणा करण्यासाठी ४०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून एका रेल्वेसाठी ६० लाख निधी देण्यात आला आहे. या योजनेत पुणे-मुंबई मार्गावरील प्रगती एक्सप्रेस ही एकमेव गाडी होती.