05 July 2020

News Flash

‘अस्मिता लाल’ निर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात

मासिक पाळीविषयक आरोग्य जनजागृतीचे कार्य

मासिक पाळीविषयक आरोग्य जनजागृतीचे कार्य

प्रबोध देशपांडे, अकोला

ग्रामीण भागात मासिक पाळी विषयी अनेक गैरसमज असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या गंभीर प्रश्नावर काम करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जनजागृतीपासून ते वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कार्याची साखळी करून त्यावर काम केले जात आहे. अकोल्यातील युवक वर्गाच्या सहकार्यातून सर्वप्रथम ‘रक्तस्राव होण्यात आनंद’ या संगीत अल्बमची निर्मिती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेऊन ते गाणे ट्विट केले. आता महिला बचत गटांच्या सहकार्यातून ‘अस्मिता लाल’ सॅनिटरी नॅपकिन तयार केले जाणार आहेत.

२८ मे रोजी मासिक धर्म स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या प्रश्नावर कार्य करण्याची संकल्पना अकोल्यात पुढे आली. सामाजिक कार्य करणाऱ्या अकोल्यातील युवांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सुफी कलाकार, शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी आणि एमबीबीएस पदवीधर २८ वर्षीय तारिक फैज याने गीत लिहिले. रमिझ राजा याने त्या गाण्याला संगीतबद्ध केले. कृतिका आणि रसिक बोरकर या भगिनींनी ते गाणे गायले. विनाशुल्क हे कार्य करण्यात आले. या विषयावर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करणारी २२ वर्षीय सांची गजघाटे हिची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. अत्याधुनिक पद्धतीने गाणे रेकॉर्डिग करून त्याचे चित्रिकरण करण्यासाठी निधीची समस्या होती. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी युनिसेफशी संपर्क साधला. युनिसेफसह मुंबई येथील माहितीपटाचे निर्माते प्रीतेश पटेल यांनी सहकार्य केले. पुणे जिल्हय़ाच्या भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत अल्बमचे २९ ते ३१ जुलै दरम्यान चित्रिकरण करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक विद्यार्थी व पालकांनाच कलाकार म्हणून संधी मिळाली. तिशीच्या आतील युवांच्या चिकाटीतून ‘खून जिस्म से निकले, तो ये जहाँन चले’ हा संगीत अल्बम तयार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हे गाणे  ट्विट केले.

या क्रमात आता जिल्हा परिषद महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘अस्मिता लाल’ सॅनिटरी नॅपकिन निर्मिती केली जाणार आहे. जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यातील दोन बचत गटांना उद्योग उभारण्यासाठी अग्रणी बँकेकडून कर्जपुरवठा केला जाईल. जि.प. काही टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देणार आहे. साडेतीन ते पाच लाख रुपयांचे यंत्र घेऊन उद्योग उभारण्यात येईल. रोहयोतून टिनशेडही दिले जातील. प्रत्येक उद्योगातून महिन्याला दीड लाख याप्रमाणे जिल्हय़ातील १४ उद्योगातून २१ लाख पॅडची निर्मिती होणार आहे. ग्रामीण भागातील चार लाख महिलांपर्यंत पॅड अल्पदरात पोहोचवण्यात येतील. ‘अस्मिता लाल’चे घरोघरी वितरण करण्यासाठी तालुकानिहाय पाच महिला बचत गटांची नियुक्ती केली जाणार आहे. यातून रोजगार निर्मितीही होईल. अतिरिक्त पॅड तयार झाल्यास इतर ठिकाणीही ते पाठवण्याचे नियोजन आहे.

विल्हेवाटीसाठी यंत्र

वापरलेल्या पॅडची विल्हेवाट यंत्राच्या माध्यमातून लावण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हय़ातील प्रत्येक ग्रामपंचायतींना यंत्र खरेदीसाठी सात हजारांचे अनुदान दिले. यासाठी जि.प.चे तीन विभाग एकत्र आले आहेत.

व्यापक जनजागृती करून महिलांना परवडेल या दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे युवा व महिला बचत गटांची मदत घेतली जात आहे.

– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अकोला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 3:30 am

Web Title: music album for create awareness in girls over menstrual cycle zws 70
Next Stories
1 अश्लीलतेचा ठपका ठेवत पहिलीतील मुलाला शाळेतून काढले
2 आजोबाचा खून करून २५ तोळे सोने लुटले
3 सोलापुरात दमदार पाऊस ; सांगली जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
Just Now!
X