नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळय़ासाठी जमा होणाऱ्या लाखो भाविकांच्या जनसागराच्या सुरक्षेसाठी नगरच्या क्रिसालीस सॉफ्टवेअर अँड सिस्टिम प्रा. लि. कंपनीने नाशिक पोलिसांच्या मदतीने आपत्ती निवारण व्यवस्थापन संगणक प्रणाली (वेब मॅपिंग अॅप) विकसित केली आहे. यासाठी ‘क्रेडाई नाशिक’ या संस्थेने सामाजिक उत्तरदायित्व जपत आर्थिक योगदान दिले आहे.
कुंभमेळय़ासाठी ऐनवेळी जमा होणारा प्रचंड मोठय़ा जनसमुदायाला काबूत कसे करावे, एखादी दुर्घटना घडली तर जखमी व इतर भाविकांना सुरक्षित मार्गानी बाहेर कसे न्यावे, बेकाबू लोकांना बँरिकेड्स लावून व अडवून कोणत्या मार्गाने हलवावे असे क्राऊड मॅनेजमेंट व डिझास्टर मॅनेजमेंटचे उपयुक्त वेब अॅप पोलीस व स्थानिक प्रशासनाला मार्गदर्शन करणार आहे.
‘क्रिसालीस’ कंपनीचे संचालक विक्रम बोठे व प्रताप बोठे यांनी ही माहिती गुरुवारी पत्रकारांना दिली. कंपनीचे मुख्य कार्यालय अमेरिकेत असले तरी नगर, पुणे, मुंबई व नाशिक येथे कंपनीची कार्यालये आहेत. कंपनीने कुंभमेळय़ाचे वेब अॅप नगरच्याच कार्यालयात विकसित केले. त्यासाठी सहा जणांची टीम सुमारे गेल्या वर्षभरापासून काम करत होती. टीममध्ये सोनल गुंदेचा, हृषीकेश अहिरे, अपर्णा साळवे, जेम्स दास यांचा समावेश होता.
या नाशिक वेब अॅपचे सादरीकरण पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्यासमोर करण्यात आल्यानंतर त्याचे प्रशिक्षण नाशिकच्या पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. ही संगणक प्रणाली भारतातील मोठय़ा धार्मिक स्थळांसाठी तसेच गणेशोत्सव, नवरात्री यासाठीही उपयुक्त ठरेल, असा विश्वास बोठेद्वयींनी व्यक्त केला.