खासदार उदयनराजे भोसले हे सध्या आक्रमक झाल्यचे दिसत आहेत. सातारा पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे. ग्रेड सेपरेटरच्या उद्‌घाटनावेळी त्यांनी सर्व भुयारी मार्गांना महान व्यक्तींची नावे दिली. त्यानंतर आता पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा पालिका हद्दीत येणाऱ्या बाँम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डाण पुलाचे “श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादासाहेब उड्डाणपूल” असे नामकरण करण्याता आल्याचे समोर आले आहे. याबाबत अद्याप कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सध्या ग्रेड सेपरेटरच्या उद्‌घाटनावर भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्हा प्रशासन असे शीत युध्द सुरू असल्याचे दिसत आहे. उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरची पाहणी करण्याच्या निमित्ताने थेट उद्‌घाटन करून तो सातारकरांसाठी खुला केला. यावेळी ग्रेड सेपरेटरच्या भुयारी मार्गाच्या चारही प्रवेशाच्या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) भुयारी मार्ग व श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज  भुयारी मार्ग अशा नावांचे फलकही लावले गेले.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गाला लावलेला फलक फाटला. यामागे राजकारण असल्याचे कारण पुढे करून उदयनराजे समर्थक आक्रमक झाले. त्यामुळे साताऱ्यात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा फलक हटवला. त्यानंतर उदयनराजे समर्थकांनी त्या जागी नवीन फलक लावला. तर, पोलिसांनी फाटलेल्या फलकाचा तपास करून तो वाऱ्याने फाटल्याचा निष्कर्ष काढल्याने तणाव निवळला.

हा विषय ताजा असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रेड सेपरेटरचे शासकीय उद्‌घाटन होणार असल्याचे जाहीर केले व याची जबाबदारी बांधकाम विभागावर दिल्याचे सांगितले. तसेच, ग्रेड सेपरेटरमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचे सांगितले. त्यानंतर उदयनराजेंनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांसमवेत ग्रेड सेपरेटरची पाहणी केली. तसेच, सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागेची देखील पाहणी केली आहे.