नाना पटोले यांचा आरोप; पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

शेतकरी व ओबीसी समाजाचे प्रश्न पंतप्रधानांच्या बैठकीत मांडल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी संतापले व त्यांनी मला चूप बसवले. सूरजागड लोह प्रकल्प याच जिल्हय़ात व्हावा अशी आपली इच्छा होती. मात्र, सरकारशी संगनमत असल्यानेच तीन हजार पोलिसांच्या सुरक्षेत येथील लोह खनिज इतरत्र पाठविले जात आहे. ओबीसी, शेतकरी, आदिवासी, विद्यार्थ्यांच्या अख्ख्या पिढय़ा उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करीत याविरुद्ध आयुष्यभर लढा देत राहील, असा निर्धार माजी खासदार नाना पटोले यांनी केला. यावेळी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर  त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कुणबी महामेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना आमदार बाळू धानोरकर, आमदार सुनील केदार, कवी प्रा.ज्ञानेश वाकुडकर, प्रा.दिलीप चौधरी, मेघा रामगुंडे, वैष्णवी डफ, प्रफुल्ल गुडधे, नरेंद्र जिचकार उपस्थित होते. गडचिरोलीच्या इतिहासात प्रथमच कुणबी समाजाचा अभूतपूर्व मेळावा झाला. २० हजार लोकांच्या भरगच्च उपस्थितीत नाना पटेले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. आज शेतकरी संकटात आहे.  त्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. मात्र आणेवारीची इंग्रजकालीन पध्दत अजूनही सुरूच आहे. ती बंद करण्याची मागणी आपण पंतप्रधानांच्या बैठकीत करून शेतकरी व ओबीसींचे प्रश्न मांडले, तेव्हा पंतप्रधान माझ्याच अंगावर आले. मी त्यांच्या नव्हे तर बहुजनांच्या भरवशावर निवडून आलो. आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली. परंतु याच सरकारने सर्वोच्च न्यायालयात शिफारस लागू करता येणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. पंतप्रधान ओबीसी हिताचे निर्णय घेत नाही हे लक्षात येताच तेव्हाच त्यांची जात शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा २००१ मध्ये ते गुजरातचे मुख्यमंत्री असतांना खुल्या प्रवर्गात होते. नंतर ते तेली कसे झाले, असा सवाल पटोले यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना गरिबांची आस्था नाही. त्यांनी मच्छीमारांकडे साफ दुर्लक्ष केले. आता गडचिरोलीतील आदिवासींनाही वाऱ्यावर सोडून सरकारच्याच आशीर्वादाने सुरजागड येथील लोह खनिज तीन हजार पोलिसांच्या सुरक्षेत इतर जिल्हय़ात नेले जात आहे. उद्योगाचा येथे पत्ता नाही. शेतकऱ्यांनाही संपविण्याचा डाव आहे. ऑनलाईनसाठी त्यांना रांगेत उभे केले, असाही आरोप पटोले यांनी केला.

याप्रसंगी आमदार सुनील केदार यांनी सरकारवर ‘फोडा आणि झोडा’ या इंग्रजांच्या नीतीचा आरोप केला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.नरेंद्र आरेकर यांनी केले. प्रास्ताविक महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी तर आभार धनपाल मिसार यांनी मानले.

शिवसेना आमदारांची पंतप्रधानांवर टीका

केंद्र व राज्यातील भाजपचा सहकारी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडवी टीका केली. मोदींनी देशाला देशोधडीला लावले आहे. नोटबंदी करून मोदींनी महिलांच्या पैशावर डल्ला मारला. जनधन योजनेतून लोकांच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. उलट सरकारने १२५ कोटी लोकांचा विश्वासघात केला. ज्यांनी केवळ खारीक, बदाम खाऊन पूजापाठ केले, ज्यांनी कधी शेती केली नाही, तेच लोकांना गोमूत्र आणि गायीच्या गोष्टी सांगायला लागले आहेत, अशी टीका करून आमदार धानोरकर यांनी हे सरकार ‘अपघाती सरकार’ असल्याचे सांगितले.