अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. मागील काही दिवसांपासून या घटनेच्या तपासावरून आरोप होताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सुशांत सिंहच्या पूर्वीची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केलेली नाही, तर तिची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे,” असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

मुंबईतील भाजपा मुख्यालयात नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांनी सुशांत सिंह प्रकरणाच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर त्याच्या पूर्वीच्या मॅनेजरचीही हत्या करण्यात आलेली असल्याचं म्हटलं आहे. “सुशांत सिंहची आत्महत्या नाही, हत्या आहे. अनेक तज्ज्ञ सांगताहेत, मी सुद्धा तेच म्हणतो. यात कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एफआयआर दाखल झालेला नाही. बिहारमध्ये झाली. १३ तारखेला पार्टी झाली. त्यात सुशांतसोबत कोण होतं. ८ तारखेला पार्टी झाली. दोन तास उशिरा आलेला आणि सुशांतला हॉस्पिटलमध्ये नेणारा माणूस कसा सांगू शकतो, लटकलेलं पाहिलं. दिनो मोरियाच्या घरी दररोज मंत्री येतात. तिथे काय चालतं. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहे,” असं राणे म्हणाले.

आणखी वाचा- सुशांत सिंहची हत्याच झालीये; नारायण राणे यांचा दावा

“सुशांतच्या केसमधील रिया चक्रवर्ती ही प्रमुख व्यक्ती तीन चार दिवसांपासून गायब झालेली आहे. तिला शोधून तिच्याकडून सुशांतची हत्या की आत्महत्या याची माहिती घेणं आवश्यक आहे. सुशांतला धमक्या येत होत्या. त्या कोणाच्या होत्या. हे पोलिसांना माहिती नसेल असं मला वाटत नाही. सुशांतची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन हिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या. तिला भगवती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ८ तारखेला तिने आत्महत्या केली, शवविच्छेदन ११ तारखेला केलं. पोलिसांनी या आत्महत्येबद्दल अधिक माहिती का घेतली नाही. पार्टीला असलेल्यांपैकी तिच्याशी किती जणांचा संबंध आहे. मला अशी माहिती मिळाली की, तिच्या शवविच्छेदनामध्ये असं दिसून आलं की तिनेही आत्महत्या केलेली नाही. तिची पण हत्या आहे. तिच्यावर बलात्कार करून तिला मारलेलं आहे. तिच्या गुप्तांगावर जखमा आढळल्या आहेत. या जखमा वरून पडून होत नाही. अशावेळी शवविच्छेदन बलात्कार झाला की नाही, हे तपासण्यासाठीच केलं जातं. ते लवकरच बाहेर येईल,” असं नारायण राणे म्हणाले.