एक नक्षलवादी जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोली : कुरखेडा उपविभागांतर्गत मालेवाडा पोलीस मदत केंद्र हद्दीतील खोंब्रामेंढा व हेटाळकसाच्या जंगलात नक्षल विरोधी अभियान राबवणारे सी-६० पथक व नक्षलवाद्यांमध्ये तीन वेळा चकमक झाली. ६० ते ७० मिनिटे चाललेल्या या चकमकीत एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
खोंब्रामेंढा- हेटाळकसाच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू असून ६० ते ७०च्या संख्येत मोठ्या प्रमाणात नक्षली सहभागी झाली असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक गोयल यांच्या मार्गदर्शनात अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वात जंगल परिसरात सी-६० पथकाने शनिवारी सकाळी सात वाजता नक्षल विरोधी अभियानाला सुरुवात केली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे ६० ते ७० मिनिटे चाललेल्या या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले. चकमकीनंतर सी-६० पथकाने जंगलात शोध अभियान राबवले असता घटनास्थळी ठिकठिकाणी रक्त सांडून दिसले. त्यावरून या चकमकीत एक नक्षलवादी जखमी झाला असावा, असा अंदाज आहे. यावेळी घटनास्थळाहून ३०३ रायफल, काडतूस, नक्षल पिट्टू, ३ प्रेशर कुकर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, दोन सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब तसेच मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा व नक्षलवाद्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य मिळून आले.