पोलिस दलात नोकरी करू नका, पोलिस खबरे, एसपीओ, कोतवाल व पोलिस पाटलांनी तात्काळ कामे बंद करावी, असे आवाहन करून नक्षलवाद्यांनी एसपीओ व पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून अहेरी तालुक्यातील कमलापूरजवळच्या कोडसेगुडम येथील पोलिस पाटलाच्या अपह्रत मुलगा रवींद्र शंकर सुनकरी याची गोळ्या घालून हत्या केल्याने या जिल्ह्य़ात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.
नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य राज्याचे मुख्यालय असलेल्या या जिल्ह्य़ात पोलिस विरुध्द नक्षलवादी, असे युध्द छेडले आहे. त्यातूनच सशस्त्र नक्षलवाद्यांनी आठवडाभरापूर्वी अपहरण केलेल्या पोलिस पाटलाच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना आज सकाळी अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे उघडकीस आली. रवींद्र शंकर सुनकरी (२४, रा.कोडसेगुडम) असे मृत युवकाचे नाव आहे. रवींद्र हा एसपीओ (विशेष पोलिस अधिकारी) असल्याचा नक्षल्यांचा संशय होता. कोडसेगुडम येथील पोलिस पाटील शंकर सुनकरी यांच्या घरी शनिवार, १६ मे च्या मध्यरात्री २० ते २५ सशस्त्र नक्षलवाद्यांनी प्रवेश करून झोपेत असलेल्या रवींद्रला सोबत जंगलात नेले. तब्बल पाच दिवसांनंतरही रवींद्र घरी परतला नाही. या अपहरणनाटय़ानंतर रवींद्रच्या कुटुंबीयांनी परिसरातील जंगलात त्याचा शोध घेतला. मात्र, कुठेही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. जिल्हा पोलिस दलही रवींद्रचा शोध घेत होते. mh02
पोलिसांची शोधमोहीम सुरू असतांनाच काल कमलापूरजवळ आशा तलावालगत नक्षली व पोलिसांची चकमक उडाली. तेथून नक्षलवादी जंगलात पसार झाले. पोलिसांची शोधमोहीम सुरू असतांनाच आज सकाळी रवींद्रचा मृतदेह कमलापूर-छल्लेवाडा मार्गावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. नक्षलवाद्यांनी त्याची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केली. घटनास्थळी नक्षलवाद्यांनी बरीच पत्रके टाकलेली सापडली. तो संपूर्ण माहिती पोलिसांना देत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याचे नक्षल्यांनी पत्रकात
म्हटले आहे.
दरम्यान, रवींद्रची हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला व नवयुवकांना पोलिस दलात भरती होऊ नका, असे जाहीर आवाहन केले आहे. पोलिस दलाची नोकरी जनविरोधी असून कमलापूर, तिटीगुडेम, कोडसेगुडम येथील नवजवान पोलिस दलात भरती झाले तर याद राखा, असा दमच नक्षलवाद्यांनी दिल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिस खबरे, एसपीओ, कोतवाल व पोलिस पाटलांनी तात्काळ आपली कामे बंद करावी, असा इशाराही नक्षलवाद्यांनी या पत्रकातून दिला आहे. पोलिस पाटील, एसपीओ व कोतवाल बनून आपल्याच लोकांविरुध्द, जनयुध्दाच्या विरेाधात गद्दारी करू नका, अन्यथा त्यालाही रवींद्रप्रमाणे शिक्षा ठोठावण्यात येईल, असाही इशारा देऊन सर्व कोतवाल व एसपीओंनी स्वत:ची चूक मान्य करून पदाचा राजीनामा द्यावा, असेही आवाहन केले आहे. रवींद्र एसपीओ बनला म्हणूनच त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली, असेही नक्षलवाद्यांचे म्हणणे आहे. नक्षलवाद्यांच्या या हत्यासत्रामुळे स्थानिक आदिवासींमध्ये प्रचंड असंतोष व भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी रवींद्रच्या अपहरणाचे वृत्त फेटाळून लावले होते. आज रवींद्रची हत्या झाल्यानंतर जिल्हा पोलिस दल तोंडघशी पडले आहे.
भीतीपोटी पाच तास प्रवाशांसह उभीच
दोन दिवसापूर्वी नक्षलवाद्यांनी कमलापूर परिसरात मोठय़ा प्रमाणात पत्रके, पोस्टर व बॅनर लावले होते. त्यामुळे एकही एसटी बस कमलापूर व परिसरात जाण्यास तयार नव्हती. या मार्गावर एक बस तर तब्बल पाच तास प्रवाशांसह उभी होती. नक्षलवाद्यांच्या या बॅनरमुळे प्रवाशांना पाच तास ताटकळत रस्त्यावर भर उन्हात उभे राहावे लागले.