News Flash

ईडीच्या नोटीशीवर एकनाथ खडसेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी नोटीस?

संग्रहीत छायाचित्र

सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस पाठवली जाणार असल्याच्या चर्चेवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार असल्याचं खडसेंनी सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ खडसे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंबंधी माहिती देताना अद्याप आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी आपल्याला नोटीस येणार असल्याची माहिती मिळाली असल्याचंही सांगितलं आहे. पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ही नोटीस पाठवली जाणार आहे.

“मला अनेक सुत्रांकडून नोटीस येणार असल्याचं कळालं आहे. जिथपर्यंत मला कळालं आहे ही नोटीस पुण्यातील भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी आहे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. “ख्रिसमसची सुट्टी असल्याने कदाचित नोटीस अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेने नोटीस पाठवली तरी मी चौकशीला सामोरं जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्याचं कारणच नाही,” असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे यांनी नुकतंच भाजपासोबतचे ४० वर्षांचे संबंध तोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच आपण भाजपामधून बाहेर पडत असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले होते. पुणे जमीन व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोपांमुळे एकनाथ खडसेंना जून २०१६ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. राष्ट्रवादीने राज्यपाल नियुक्त जागांसाठी एकनाथ खडसेंच्या नावाची शिफारस केली आहे.

“माझ्याविरोधात सुरु असलेल्या चौकशांमुळे आश्चर्य वाटत आहे. मला नेहमी वाटायचं की ईडी १०० कोटी किंवा त्याहून अधिकच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालतं. जर हे पुणे जमीन प्रकरणाबद्दल असेल तर त्यात चार कोटींहून कमी व्यवहार आहे. ज्या जमिनीबद्दल चर्चा आहे ती माझी पत्नी आणि जावयाने विकत घेतली होती. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आहे,” असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

“या व्यवहाराची चौकशी करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने मला आधीच क्लीन चीट दिली आहे. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. निवृत्त न्यायाधीशांच्या आयोगाने केलेल्या चौकशीतही काही समोर आलं नव्हतं,” असंही खडसेंनी सांगितलं.

“मला अशा प्रकारच्या चौकशांची सवय आहे. मी स्वत: या जमिनीचा मुद्दा विधानसभा आणि सार्वजनिक ठिकाणी २०१६ पासून अनेकदा उपस्थित केला आहे. मी माझी बाजू मांडली आहे. आरोप करणाऱ्यांना या व्यवहारात नेमका गुन्हा काय आहे हेदेखील मी विचारलं आहे. पण अद्यापपर्यंत उत्तर आलेलं नाही,” अशी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.

दरम्यान एनसीपीने एकनाथ खडसेंना विधानपरिषद सदस्या होण्यापासून रोखण्यासाठी ईडीची कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. ईडीच्या चौकशीमुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यपाल नियुक्त उमेदवारीवरही होऊ शकतो असं एनसीपीने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 8:38 am

Web Title: ncp eknath khadse reaction on ed notice pune bhosari land deal sgy 87
Next Stories
1 एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस?
2 किमान तापमानात वाढ
3 जानेवारीच्या अखेरीस दिल्लीत शेवटचे उपोषण -हजारे
Just Now!
X