दुष्काळामध्ये तुम्ही राज्यात ६ हजार ५९७ टँकरद्वारे राज्याला पाणीपुरवठा करत होता ही काय भूषणावह गोष्ट आहे का ? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ‘राज्याला दुष्काळमुक्त करू’ असं म्हणून तुम्ही सत्तेत आला होतात आणि आता पाच वर्षांनी तुम्हाला राज्याला ६ हजार टँकर रोज द्यावे लागत आहेत. कशासाठी स्वतःची पाठ थोपटून घेताय ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारला केला आह.

हे बजेट केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं बजेट आहे. ‘ऋण काढून सण साजरा करू नये’ असं आपल्याकडे म्हणतात. मात्र निवडणुकीचा सण साजरा करण्यासाठी आमच्या सरकारने ऋण काढायचं ठरवलंय. एक दोन नव्हे तर या ग्रेट सरकारने २० हजार २९२ कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. एवढ्या मोठ्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल सुधीरभाऊ, तुम्ही तुमच्या सगळ्या आमदारांना पार्टी दिली पाहिजे. म्हणजे राज्याचं सगळ्यात जास्त वाटोळं करणारा निर्णय तुम्ही घेतला असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपने आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या पण एकाही गोष्टीला यांनी स्पर्श देखील केला नाही. गेल्या पाच वर्षांत किती नवीन सरकारी नोकऱ्या निर्माण झाल्या ? आणि नुकतंच शिक्षण पूर्ण केलेल्या किती तरुण किंवा तरुणींना या नोकऱ्या लागून त्यांनी जॉईन केलं ? गेल्या पाच वर्षांत किती नवीन खासगी नोकऱ्या निर्माण झाल्या आणि नुकतंच शिक्षण पूर्ण झालेल्या किती जणांना अशा नोकऱ्या लागल्या ? गेल्या पाच वर्षांत पेट्रोल डिझेलचे दर का कमी झाले नाहीत ?गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात किती नवीन उद्योग उभे राहून ते सुरु झाले ? गेल्या पाच वर्षांत महागाई का कमी झाली नाही ? असे अनेक सवाल जयंत पाटील यांनी विचारले आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे. त्यांच्या ट्विटरवरून अधिकृत आणि वेरीफाइड ट्विटर पेजवरून, अर्थसंकल्पात काय आहे याच्या पोस्ट केल्या जात होत्या. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडले. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प फोडला. आदल्या रात्रीच ग्राफिक्स डिझायनरला हे दिलं म्हणून इतके नीटनेटके ट्विट झाले. याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. जर राज्याची रोजगाराची स्थिती चांगली आहे. असा आपला दावा असेल, तर मंत्रालयातील वेटरच्या १३ जागांसाठी पाच हजार अर्ज का आले ? असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला.

दुष्काळ कसा हाताळू नये याचा वस्तुपाठ या सरकारने सगळ्यांना घालून दिलेला आहे. राज्य दुष्काळामध्ये होरपळत असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री राज्याचा विरोधी पक्षनेता फोडण्यात मग्न होते असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. अर्थमंत्री त्यांच्या भाषणात म्हणाले कि १८ हजार ६४९ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली आहेत. जर १८ हजार गावांत जलयुक्त शिवारची कामे पूर्ण झाली असतील, तर मग आज राज्यात पंधरा – वीस – पंचवीस हजार गावांमध्ये दुष्काळ का आहे ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

सरकार सर्व योजना श्रीमंतासाठी करत आहे. ट्रॅक्टर,शेती अवजारे, फवारणी यंत्रे, शेततळे आच्छादन यांच्यावरचा GST पाच टक्यांनी कमी करण्याची गरज आहे. जीएसटी पाहता तुम्ही शेतकऱ्यांना जगवायला आहात की मारायला आलात तेच कळत नाही अशी शंका जयंत पाटील यांनी उपस्थित केली. सत्ताधाऱ्यांनी राज्याचा कृषी विकासदर दोन आकडी करणार असल्याच्या बाता मारल्या होत्या. मात्र आज राज्याच्या कृषी विकासदर ०.८ इतका आहे. विकासदर किमान एक आकडी तरी करा ! अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

विद्यार्थी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी कै. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडट अँड युथ मुव्हमेंट नावाचे केंद्र मुंबई विद्यापीठात स्थापण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.मला हे गृहस्थ कोण आहेत याआधी मला माहिती नव्हते. ते भाजपाचे उपाध्यक्ष होते आणि राज्यसभा सदस्य होते आणि एक वकील होते. त्यांचे विद्यार्थी आणि युवक चळवळीत किती आणि काय योगदान आहे, याची माहिती मला मिळालेली नाहीये. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात त्याबद्दल माहिती द्यावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. धनगर समाज या सरकार सोबत राहण्याचे काही कारणच राहिले नाही. शेवटच्या अधिवेशनातही यांनी धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला नाही.

बऱ्याच महापुरुषांची स्मारके तयार करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाला एकही रुपया का दिलेला नाही हे मात्र कळलं नाही. गडचिरोली भागात बिरसा मुंडाचे एक मोठे स्मारक असावे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला सुद्धा एक रुपयाही या अर्थसंकल्पात नाहीये. ज्या अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या स्मारकाला एक रुपया सुद्धा नाहीये, तो अर्थसंकल्प तुम्हाला मान्य आहे का ? अशी विचारणा शिवसेना सदस्यांना जयंत पाटील यांनी केली.

आणखी एका गोष्टीच्या बाबतीत सरकारच अभिनंदन केलं पाहिजे कि त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच स्मारक मुंबईत बनवण्याचा निर्णय घेतला. ही बाब प्रशंसनीय आहे, सोबतच अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवन आणि विचार यांचीही सविस्तर माहिती आणि अभ्यास या सरकारने केला पाहिजे, असं मला वाटतं. मी काय कोणाचे नाव घेणार नाही पण अटल बिहारी वाजपेयी यांची कारकीर्द आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून जे मिरवतात त्यांची कारकीर्द यांच्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे असा टोला जयंत पाटील यांनी मोदी यांचे नाव न घेता लगावला.