राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची भाषा बीडमधले नेते करतात, मात्र लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस संपवणं हे चिक्की खाण्याएवढं सोपं नाही असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर शरसंधान केलं. परळीमध्ये सहा जिल्हापरिषद नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवक आमचे आहेत. हिंमत असेल तर समोरासमोर या कोण संपतंय पाहू असं आव्हानही पंकजा मुंडे यांना त्यांनी दिलं आहे. आजच पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं डिपॉझिट जप्त करू असं वक्तव्य केलं होतं. या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. परळीत झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.

या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री परळीत आले होते, त्यांनी परळीवर टीका केली. मात्र मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा मस्तवाल सत्तेचा शेवट परळीत होतो. तुम्हाला परळीबद्दल इतकी अडचण आहे तर तुम्ही सुरुवात परळीपासून का केली? रायगडासारख्या पवित्र भूमितून का केली नाही? तुमच्या मनात काळं आहे हे यावरूनच स्पष्ट होतं असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तसंच तुमच्या सोळा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवाल का? असाही प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला.

औरंगाबाद येथे गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक आणि महामंडळ झालंच नाही. विधानसभेत मी पराभूत झालो तरीही पवारसाहेबांनी मला विरोधी पक्ष नेतेपद दिलं, त्यामुळेच मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडून त्यावर आवाज उठवू शकलो, परळीत आजवर मी एवढी मोठी सभा पाहिलेली नाही असंही धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात म्हटले.

या सभेला जोगेंद्र कवाडेंचीही उपस्थिती होती. देशाच्या मातीत जातीयवादी सरकार मिसळून टाकण्याची वेळ आली आहे आहे. आपण सगळ्यांनीच हा निर्धार करायचा आहे. देशात कुणीही सुरक्षित नाही, संभाजी भिडेंसारख्या लोकांना संरक्षण देणारं हे सरकार आहे लोकांनी त्यांच्या मनातला आक्रोश मतपेटीत उतरवला पाहिजे असं जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी म्हटलं.