बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांच्या पत्नी संगीता धस यांच्यासह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या दोन समर्थकांना आपल्या पॅनेलमधून उमेदवारी देत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये उभी फूट पाडण्यात यश मिळवले, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व आमदार अमरसिंह पंडित यांनी बँक बचाव पॅनेल मदानात उतरवून आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहुतांशी राष्ट्रवादी व काँग्रेस नेते भाजपच्या गळाला लागल्याने बँकेवर पंकजा मुंडे यांचे वर्चस्व राहील, असे मानले जात आहे.
बीड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी उद्या (मंगळवारी) निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पालकमंत्री मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ लोकविकास पॅनेलचे ५ उमेदवार बिनविरोध निवडले गेले. उर्वरित १४ जागांसाठी ३७ उमेदवार िरगणात आहेत. मुख्य लढत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलच्या ‘पतंग’ आणि भाजप पॅनेलच्या ‘छत्री’मध्ये होत आहे. आमदार धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्या वाढत्या विरोधाला लगाम घालण्यासाठी जिल्हा बँक निवडणुकीची संधी साधून पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या दोन माजी मंत्र्यांसह काँग्रेस व इतर नेत्यांना सत्तेच्या ‘छत्री’खाली घेतल्याने विरोधकही विसावले.
पंकजा मुंडेंना वैद्यनाथ कारखान्यापाठोपाठ जिल्हा बँक निवडणुकीत प्रखर विरोध करण्यासाठी धनंजय मुंडे व अमरसिंह पंडित यांनी पॅनेल मदानात उतरवले, मात्र राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजप पुरस्कृत पॅनेलबरोबर आघाडी करीत पत्नी संगीता धस यांना महिला मतदारसंघातून उमेदवार केले, तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही आपले समर्थक शीतल कदम यांना बिनविरोध निवडून आणले. अंबाजोगाईचे दिनेश परदेशी यांना पंकजा मुंडे यांच्या पॅनेलमधून स्थान दिले. राष्ट्रवादीअंतर्गत जिल्ह्यातील दोन माजी मंत्रीच भाजपच्या गळाला लागल्याने राष्ट्रवादीच्या मुंडे-पंडित जोडीचे पॅनेल निष्प्रभ ठरला आहे.
परस्परांचे कट्टर विरोधक बँकेच्या निवडणुकीत एकत्र आल्याने नवीन समीकरणे जुळू लागली आहेत. पॅनेलच्या प्रचारासाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे, पालकमंत्री मुंडे यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्याही छबी झळकू लागल्या आहेत. माजी पालकमंत्री क्षीरसागर यांनी आपले दोन समर्थक भाजपच्या पॅनेलमध्ये दिले असले तरी जाहीर प्रचारातून क्षीरसागर यांनी अलिप्त राहणेच पसंत केले. राष्ट्रवादीच्या मुंडे-पंडित यांच्या पॅनेलच्या जाहिरातीमध्ये माजी मंत्री प्रकाश सोळंके आणि अक्षय मुंदडा यांची नावे प्रसिद्ध असली, तरी त्यांचा फारसा सहभाग दिसला नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनी या निवडणुकीत पक्षाच्या पॅनेलला आपले छायाचित्रही वापरू दिले नाही. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीअंतर्गत नेत्यांमध्ये फूट पाडण्यात पंकजा मुंडेंची खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.