आगामी निवडणुकीमध्ये समविचारी पक्षाना एकत्रित आघाडीत आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे. मात्र राज ठाकरे याना आघाडीत घेण्याबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी दिली. ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असेही त्यांनी सांगितले.

पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीबद्दल सतत नकारात्मक भाषा करत आहेत. मात्र त्यांचे दुःख, वेदना काय आहेत याबाबत माहिती नाही. त्यांचे काँग्रेससोबत बोलणे सुरू आहे. राष्ट्रवादीसुध्दा त्यांना आघाडीत घेण्यास अनुकुल आहे. मात्र मनसेचे राज ठाकरे यानी अद्यापपर्यंत तरी काँग्रेस , राष्ट्रवादीसोबत येण्याची चर्चा झालेली नाही. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षणाचा अहवाल आलेला आहे. त्यावर आता चर्चा होईल. सरकार आता सर्व कायद्याच्या कसोटीवर निर्णय घेतला जाईल, अस सांगत आहे. राष्ट्रवादीची भूमिका ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे मत आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेवरचा जनतेचा विश्वास उडालेला आहे. दोन्ही ठिकाणी सत्तेत राहून दुटप्पी भूमिका घ्यायची. यांचे केंद्रीय मंत्री अनंत गितेच विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित नव्हते. तर जनतेने यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा टोला त्यांनी सेनेला लगावला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आगामी निवडणुकातील जागावाटपात सोबत येणाऱ्या समविचारी पक्षांनाही सामावून घेतल जाईल. त्याना समाधानकारक जागा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती तटकरे यांनी यावेळी दिली.