News Flash

राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची येत्या बुधवारी बैठक, शरद पवार घेणार मतदारसंघाचा आढावा

शरद पवारांच्या उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक होणार असून पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Sharad-Pawar
(Photo : File)

२०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झालेले तसेच पराभूत झालेल्या उमेदवारांची, आजी-माजी आमदारांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. बुधवार (८ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची ही नियोजित बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती. मात्र, शरद पवार यांच्या तब्येतीच्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता ही बैठक येत्या बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सर्वच ठिकाणी शिवसेना, काँग्रेससोबत आघाडी करूच असं नाही!

राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी १ सप्टेंबर रोजी पक्षातील मंत्र्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकांच्या तयारीचा आणि राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतल्यानंतर एक निराळी भूमिका जाहीर केली होती. “राज्यात पुढील वर्षांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी आम्ही शिवसेना, काँग्रेसबरोबर आघाडी करूच असं नाही. काही ठिकाणी आम्हाला स्वबळावर तर काही ठिकाणी दोन किंवा तीन पक्षांची आघाडी करण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे”, अशी माहिती त्यावेळी नवाब मलिक यांनी दिली होती.

राज्यात येत्या वर्षांत मुंबईसह २३ महानगरपालिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा इ. निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांदरम्यान कुठे आघाडी करता येईल, किंवा कुठे स्बळावर लढता येईल याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे, यासाठी प्रत्येक मंत्र्याकडे एका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, त्यानंतर आता पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 6:31 pm

Web Title: ncp sharad pawar meeting with former and existing mlas gst 97
Next Stories
1 “अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा”
2 गणेशोत्सवासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा!
3 “…तर जावेद अख्तरना तालिबाननं चौकात फटके मारले असते”; सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य
Just Now!
X