पंढरपूर : मनसे आणि आमची विचारधारा निराळी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाबरोबर कुठल्याही प्रकारची युती करणार नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे दिले. आम्हा दोन पक्षात आघाडी होणार असल्याची चर्चा ही वावडय़ा असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा बुधवारी पंढरपूर येथे आली होती. या वेळी पाटील पत्रकारांशी बोलत होते. मनसे आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

पाटील म्हणाले, की मनसे आणि आमची विचारधारा निराळी आहे. आमच्यात युतीसाठी कुठल्याही प्रकारची चर्चाही सुरू नाही. या प्रकारच्या गप्पा या वावडय़ा आहेत. दरम्यान रायगड, कोल्हापूर, सातारा, माढासह अनेक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरून वादविवाद असल्याचे विचारले असता अजून कुठल्याही मतदारसंघांतील नावे ही अंतिम झालेली नाहीत. यामुळे या उमेदवारीवरून कुठे वाद होत असेल तर ते निर्थक आहेत. रायगडमध्ये सुनील तटकरे यांचे नाव जनतेतून पुढे आले आहे. मात्र त्यांचे नाव अद्याप घोषित केलेले नाही. रायगडसह अन्य कुठल्याच मतदारसंघातील उमेदवारी निश्चित करण्यात आलेली नाही. यामुळे परस्पर जाहीर होणाऱ्या नावांच्या चर्चाना पूर्णविराम द्या. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चर्चा करीत असून ते आमच्यासोबत येतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.