राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी (ग्रामीण) इच्छुकांची संख्या वाढल्याने हा निर्णय अखेर पक्षश्रेष्ठींवर सोपवून तो लांबणीवर टाकण्यात आला. तब्बल ३१ जणांनी या पदावर दावा सांगितला असून या सर्वाचे अर्ज बुधवारी भरून घेण्यात आले.
पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी होणार होती. पक्षाचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जगन्नाथ निंबाळकर त्यासाठी येथे आले होते. त्यांच्यासह ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, आमदार वैभव पिचड, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, दादा कळमकर आदी या वेळी उपस्थित होते. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत जिल्हाध्यक्षाची निवड झालीच नाही. इच्छुकांचीच संख्या वाढल्याने या पदासाठी निवडणूक घेण्याऐवजी पक्षश्रेष्ठींवरच हा निर्णय सोपवण्यात आला. पक्षांतर्गत निवडणुकीचे राज्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मधुकर पिचड व शेवाळे या पाच जणांनी नगरच्या जिल्हाध्यक्षाबाबत निर्णय घ्यावा, असा ठरावच या बैठकीत करण्यात आला. अभंग यांनीच हा ठराव मांडला, त्याला दादा कळमकर यांनी अनुमोदन दिले.
इच्छुकांची संख्या वाढल्याने हा निर्णय श्रेष्ठींवर सोपवण्यात आला. शेवाळे यांनी बैठकीतच इच्छुकांना अर्जही उपलब्ध करून दिले. हे अर्ज भरून घेण्यात आले. सध्याचे अध्यक्ष अभंग यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, प्रशांत गडाख, संदीप वर्पे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, सुजित झावरे, राजेंद्र कोठारी, सुजित सोमनाथ धूत आदींसह ३१ इच्छुकांनी हे अर्ज भरून दिले आहेत. या पदावर कोणाची वर्णी लागते, याबाबत आता उत्सुकता आहे. येत्या आठ दिवसांत ही निवड जाहीर केली जाईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. पक्षाच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदाचीही निवड लांबणीवर पडली असून त्याची तारीखच अद्यापि जाहीर झालेली नाही.
बैठकीत सुरुवातीला शेवाळे यांनी पक्षाच्या या निवडणुकीची माहिती दिली. राष्ट्रवादी व पक्षाचे नेते शरद पवार यांना मानणारा जिल्हा ही नगरची ओळख असून जिल्हाध्यक्ष एकमताने व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पिचड यांनी चांगला जिल्हाध्यक्ष देऊ, अशी ग्वाही दिली. तासगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सुमनताई पाटील यांचा दणदणीत विजय झाला. त्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या वेळी करण्यात आला.