|| प्रदीप नणंदकर

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत देशपातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची पूर्वपरीक्षा (नीट) रविवार, ५ मे रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत होत आहे. देशपातळीवर होत असणाऱ्या परीक्षेचे गांभीर्य टिकवण्यासाठी अतिशय कडक नियम घालून देण्यात आले असून परीक्षेच्या तयारीत अभ्यासाबरोबर पेहराव कसा असावा, यावरही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. ‘अंगापेक्षा बोंगा भारी’ असे त्याचे स्वरूप आहे.

देशपातळीवर समान बौद्धिक परीक्षा घेतली जावी या उद्देशाने अकरावी व बारावी विज्ञान शाखेच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या गुणावर एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बी.फार्मसी अशा सर्व शाखांचे प्रवेश अवलंबून आहेत.

दोन वषार्ंच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण असतो. परीक्षा बौद्धिक पातळीची आहे की त्याच्या पेहरावाची आहे हेही कळेनासे व्हावे या पद्धतीने परीक्षेला येताना परीक्षार्थीनी कोणता पेहराव अंगावर ठेवावा यासंबंधीच्या बारीकसारीक सूचना दिल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांने बूट वापरू नयेत, त्याऐवजी पायात स्लीपर किंवा साध्या चपला असाव्यात, अंगावर रंगीबेरंगी कपडे असू नयेत, शर्टला कॉलर नसावी, पूर्ण बाहय़ांचा अंगरखा नको, तो अध्र्या बाहय़ाचा असावा, शक्यतो पांढऱ्या रंगाचा असावा, पातळ असावा, अंगरख्याचे बटन मोठे व जाड नकोत, पँट जीनची नको, साधी असावी, विद्याíथनींनी भडक रंगांचे कपडे वापरू नयेत, डोळय़ाला त्रास होणार नाही अशा फिक्या रंगाचे कपडे असावेत, बटन जाड असू नयेत, डोक्याला लावायची पीन बारीक असावी, इतक्या कडक सूचना कशासाठी आहेत, याबद्दलही तपशील देण्यात आलेला नाही.

परीक्षेत गरप्रकार होऊ नयेत यासाठीच्या या सूचना असल्या तरी त्याचा मोठा अतिरेक होत असल्याची भावना परीक्षार्थीच्या मनात आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर चार पोलीस, एक पोलीस उपनिरीक्षक अशी पोलिसांची कुमक तनात करण्यात आली आहे.

परीक्षा केंद्राच्या परिसरातील मंडळींना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात त्रास होणार नाही असे आवाज करू नयेत याबद्दलच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एकूण लातूर शहरात नीट परीक्षेचे वातावरण जोरदार तयार झाले असून ‘नीटची नाटके’ हा लोकांत चच्रेचा विषय बनला आहे.

परीक्षेसाठी कपडे

गतवर्षी परीक्षेला पूर्ण बाहय़ांचा शर्ट घालून आला म्हणून अध्र्या बाहय़ा कात्रीने कापून टाकण्याचे प्रकार अनेक परीक्षा केंद्रांवर झाले आहेत. परीक्षेचा नियम असल्याने यासंबंधी परीक्षार्थी, पालक, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य हे कोणीही थेट प्रतिक्रिया द्यायला तयार होत नाहीत. मात्र, त्यांची याबद्दलची मोठी नाराजी आहे. परीक्षेच्या काळात लातूर शहरात अनेक तयार कपडे विकणाऱ्या दुकानदारांनी ‘नीट परीक्षेसाठीचे कपडे मिळतील’ अशा जाहिराती चौकाचौकात लावल्या आहेत. लातूर हे बारावी विज्ञान शाखा परीक्षेची मोठी बाजारपेठ आहे. आमच्याकडे हमखास यश मिळवून दिले जाईल, अशा जाहिराती शिकवणीवर्गाच्या वर्षभर असतात. आता परीक्षेच्या काळात परीक्षेसाठी लागणाऱ्या कपडय़ांची जाहिरातही होते आहे.