News Flash

गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात

मंत्री अशोक चव्हाण यांचे विधान

मंत्री अशोक चव्हाण यांचे विधान

केंद्रातील भाजप सरकारची एकूणच कामगिरी उणेच असली तरी केंद्रीय मंत्रिमंडळातील रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणजे ‘ चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस’ असे त्यांचे वर्णन करावे लागेल, असे मत काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कारभाराचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. नोटबंदी, जीएसटी याचबरोबर करोना हाताळणीत केलेल्या चुकांमुळे ‘ गंगा मैली’ झाल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. लसीकरणातही केंद्र सरकार भेदभाव करत असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

रस्ते विकास आणि वाहतूक क्षेत्रातील गडकरी यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांचे अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जातात. त्यांची कोंडी केली जात असल्याचेही चव्हाण म्हणाले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली जात असून जिथे रुग्ण जास्त त्या प्रमाणात लस पुरवठा करण्याची वेळ होती तेव्हा ते धोरण अवलंबले नसल्याचे ते म्हणाले. राज्यातील मराठा आरक्षणप्रश्नी आता घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारने निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला कायदा जर परिपूर्ण होता तर तो सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही, असा प्रश्न करत चव्हाण म्हणाले की, त्यांनी मराठा समाजाची दिशाभूलच केली होती. तरीही राज्य सरकारच्या विधिज्ञाबरोबरच काँग्रेसच्या अभिषेक मनु संगवी, कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलांकरवी बाजू मांडली होती. आता हा प्रश्न सोडविण्यासाठी मदानात उतरलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा उद्देश सर्वाशी चर्चा करून निर्णय घेण्याचा असल्याने प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीचे निष्कर्ष नव्या समीकरणापर्यंत जातील असा निकर्ष काढणे चुकीचे ठरेल असेही ते म्हणाले.  विनायक मेटेकडून केली जाणारी टीका स्वत:च्या विधान परिषदेतील जागा राखण्यासाठी आणि भाजप नेत्याच्या पुढे- पुढे करण्यासाठी होत आहे. त्यामुळे त्यांची विधाने गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असेही चव्हाण म्हणाले.

जालना-नांदेड महामार्ग हा महत्त्वाकांक्षी रस्ते बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईपर्यंतच्या वाहतुकीचा वेळ कमी होणार आहे. पण केंद्राच्या काही रस्त्याच्या कामात अडथळे असून काही रस्त्यांची कामे कंत्राटदारांनी दहा टक्के रक्कम घेऊन तुकडय़ांनी विकली आहेत. त्यावरही लक्ष देणार असून मराठवाडय़ातील रस्त्यांसाठी विशेष लक्ष घातले असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 3:54 am

Web Title: nitin gadkari is a good man but in the wrong party says ashok chavan zws 70
Next Stories
1 मराठा आरक्षणावरून भाजप आणि काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप
2 चंद्रपूरमधील दारूबंदी मागे घेताच,जयंत पाटलांच्या ‘त्या’ भाषणाची चर्चा!
3 दोन उद्योगपती सोडले, तर सारे काही उद्ध्वस्त
Just Now!
X