केंद्रातील सत्तारूढ यूपीए सरकारचे अन्न सुरक्षा विधेयक हे ‘मत सुरक्षा विधेयक’ असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शनिवारी नागपुरात केली. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केल्यानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.
सरसंघचालकांशी काय चर्चा झाली, असे विचारले असता राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘संघ कार्यालयात मी नेहमीच येत असतो. विविध विषयांवर येथे चर्चा होते. आगामी लोकसभा निवडणूक असा चर्चेचा विशिष्ट विषय नव्हता. परवा डॉ. मुरलीमनोहर जोशी, काल अडवाणी येऊन गेले. त्यांच्यासोबत आपण नव्हतो, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, त्यांच्यासोबत यावे असा विशिष्ट विषय नव्हता, तसेच आणि त्यांचा चर्चेचा कदाचित दुसरा विषय असेल, त्यामुळे ते आले. अडवाणी व मोदी हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका.’’ पंतप्रधान पदाबाबत विशेषत: गोवा बैठकीनंतर कुठलीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
अन्न सुरक्षा विधेयकाला भाजपचा विरोध नाही. काँग्रेसने हे विधेयक २००४ मध्ये सादर करताना ते १०० दिवसांत संमत करू, असे म्हटले होते. आकस्मिक स्थिती असेल तरच एखाद्या प्रस्तावाचे अध्यादेशात रूपांतर करता येते. काँग्रेसने त्याचा दुरुपयोग करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीने विधेयकाबाबत अध्यादेश काढला. त्यावर चर्चा व्हावयास हवी होती. या विधेयकात आम्ही काही दुरुस्त्या सुचविणार आहोत. मुळात गरीब गरीबच राहावेत, तरुण बेरोजगार राहावेत, असाच काँग्रेसचा प्रयत्न आहे. इंग्रजांप्रमाणे ‘फोडा, झोडा व राज्य करा’, अशीच काँग्रेसची नीती  असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, असे भाजपला वाटते. मात्र संसदेतील गोंधळास काँग्रेसच जबाबदार आहे, असे ते म्हणाले.
मनसे संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ‘महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भक्कम युती आहे’ एवढेच त्यांनी सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भातील प्रश्नावर ‘तेच उत्तर देतील’, असे ते म्हणाले. राजनाथ सिंह यांचे शनिवारी सकाळी नागपुरात आगमन झाले. खासदार अजय संचेती, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, आमदार विजय घोडमारे, ग्रामीण अध्यक्ष राजीव पोद्दार, महापालिकेतील सत्ता पक्षनेते प्रवीण दटके, नगरसेवक संदीप जोशी, चेतना टांक, प्रमोद पेडके यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून ते संघ मुख्यालयात गेले. तेथे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी व इतर प्रचारकांनी त्यांचे स्वागत के. त्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व राजनाथ सिंह यांची चर्चा झाली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास ते खासदार अजय संचेती यांच्या निवासस्थानी गेले व तेथून नंतर विमानाने दिल्लीस रवाना झाले.