दयानंद लिपारे, कोल्हापूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात उमेदवार कोण, अशी चर्चा एव्हाना सुरू झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेट्टी यांचे जिवलग मित्र म्हणणवारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत अथवा शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यापैकी एकाशी अथवा दोघांशी शेट्टी यांना सामना करावा लागेल, अशी चिन्हे आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेत आहे तो खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे. सहकार सम्राटांच्या या सुपीक भूमीत राजू शेट्टी यांचा राजकीय उत्कर्ष होत राहिला. जिल्हा परिषद सदस्य, शिरोळचे आमदार ते दोन वेळची खासदारकी असा राजकीय प्रवास शेट्टी यांनी केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक असलेल्या शेट्टी यांनी सहकार सम्राटांची मोठी कुमक, फौज तैनात असतानाही ‘एक व्होट-एक नोट’ असा नारा देत प्रत्येक निवडणूक जिंकली. तिसऱ्या आघाडीची मदत घेऊन पहिल्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या खासदार निवेदिता माने यांना पराभूत केले. गेल्या वेळी भाजपच्या आघाडीत शिरून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यावर मात केली. आता भाजपप्रणीत सत्तेला रामराम ठोकून शेट्टी यांनी नव्या लढाईला हात घातला आहे. कमळ नावालाही शिल्लक ठेवणार नाही, अशी आरोळी ठोकणाऱ्या शेट्टी यांची अलीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगीही वाढली आहे. किंबहुना उभय काँग्रेसचे सहकार्य शेट्टींना राहील, अशा प्रकारच्या घटना, घडामोडीही घडत आहेत. या पाश्र्वभूमीवर शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीसाठी कोणाशी आणि कसा मुकाबला होणार, याची समीकरणे मांडली जात आहेत.

भाजपशी संघर्ष

लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील दोन्ही जागा निवडून आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, भाजपकडून शेट्टींविरोधात कोणता उमेदवार असणार, यावर अद्याप एकमत झाले नाही. काही नावे पुढे येत आहेत. पण ती शेट्टींविरोधात सक्षम नसल्याने मागे पडत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांनी सत्ताधाऱ्यांना सहभागी पक्ष म्हणून सोबत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या आखाडय़ात उतरवण्याचा विचार सुरू झाला. मात्र स्वत:हून आपण लोकसभेला उभे राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे हे नाव आपसूक मागे पडले आहे. इचलकरंजीचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत आणि भाजपच्या गोटात आणून शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्याबाबतही भाजपची चाचपणी सुरू आहे. गेल्या आठवडय़ात सदाभाऊ  खोत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे विधान केले आहे. तर सदाभाऊंनी शेट्टींविरोधात शड्डू ठोकावाच असे प्रतिआव्हान स्वाभिमानीच्या शिवारातून दिले गेले आहे. उल्हास पाटील यांच्या नावाची भाजपकडून चर्चा सुरू झाल्याचा सुगावा लागल्यानंतर शिवसेना सावध झाली आहे.

 उमेदवार निवडीचा भाजप-सेनेसमोर पेच

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ  खोत यांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात रिंगणात उतरण्याची तयारी स्वत:हून केली आहे. मात्र, भाजपकडून अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही. त्यांच्या उमेदवारीचे स्वागत वा समर्थन करण्यासाठी भाजपचा कोणताही नेता पुढे आलेला नाही. शेट्टी यांचे आव्हान परतवून लावण्यात सदाभाऊ  खोत यांची सरशी होणार का याबद्दल भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी उल्हास पाटील यांचे नाव आपल्या अहवालात समाविष्ट केले आहे. पण, मुंबई सोडून दिल्लीला जाण्याबाबत खुद्द उल्हास पाटील कितपत तयार आहेत यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. याबाबत उल्हास पाटील यांना विचारणा केली असता प्रकृती बरी नसल्याचे कारण देत या गंभीर मुद्दय़ावर भाष्य करण्याचे टाळले. या घटना पाहता राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारनिश्चतीचा पेच केंद्र व राज्यातील सत्तेचे भागीदार असलेल्या भाजप-शिवसेनेसमोर दिसत आहे. शेट्टी यांनी आपल्या विरोधात कोणीही उमेदवार असला तरी आपली लढाई अटळ असल्याचे सांगून तयारी सुरू केल्याचे सांगितले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीशी मैत्री

जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा राजकीय प्रवास करणाऱ्या शेट्टी यांचा प्रत्येक निवडणुकीत सामना झाला तो काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी. या निवडणूक काळात किंबहुना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ सुरू ठेवत असताना शेट्टी यांनी सातत्याने उभय काँग्रेसमधील सहकारसम्राटांवर तोफ डागली. मात्र, अलीकडे त्यांनी केंद्र व राज्य सरकारपासून फारकत घेतली आहे. आगामी निवडणूक कोणाच्या सहकार्याने लढवायची याबाबतची स्पष्टता शेट्टी यांनी अद्याप केलेली नाही. पण गेल्या वर्षभरात शेट्टी यांचा वेगवेगळ्या कारणांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी दोस्ताना वाढला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी झालेल्या गाठीभेटीपासून ते कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील काही कार्यक्रमांमध्ये त्यांची दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी सलगी वाढली आहे. गेल्याच आठवडय़ात शिरोळ तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि खासदार शेट्टी यांनी परस्परांवर स्तुतिसुमने उधळली होती. वर्षभरात शेट्टी यांनीही सहकारसम्राटांवर कडवी टीका केलेली नाही आणि उभय काँग्रेसच्या कोणत्याच नेत्यांनी शेट्टीविरोधात टीकात्मक विधान करण्याचे टाळले आहे.